IAS SUJATA SAUNIK : पुरुषी मक्तेदारी मोडित, राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. त्या १९८७बॅचच्या आयएएस अधिकारी असून, रविवारी संध्याकाळी त्यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला. सौनिक यांच्याकडे वर्षभर या पदाचा कार्यभार राहणार आहे. विशेष म्हणजे या पदावरील पुरुषी मक्तेदारी मोडित काढण्याचा मान सुजाता सौनिक यांना मिळाला आहे. जून २०२५मध्ये त्या सेवानिवृत्त होणार आहेत.

डॉ. करीर ३० जूनला सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर रविवारी सौनिक यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांनी याआधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. करीर यांच्याआधी त्यांचे पती मनोज सौनिक यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते.

राज्याच्या मुख्य सचिवपदी रविवारी सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या सुजाता सौनिक यांच्यासोबतच ज्येष्ठतेनुसार अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र सरकारकडून अखेर सौनिक यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले.

सौनिक यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण चंडीगड व त्यानंतर पंजाब येथे झाले. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. यापूर्वी त्यांनी कौशल्य विकास, गृहमंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव; तसेच सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा अल्प परिचय

सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या टी.एच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ २०१८ मधील टेकमी फेलो आहेत. त्यांनी २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्रोस विभागातील समस्या याविषयावर मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत फेलोशिप देखील पूर्ण केली आहे. टेकमी फेलो म्हणून, महाराष्ट्राच्या विमा-आधारित आरोग्य सेवा या विषयावर अभ्यास करतांना केलेल्या संशोधनातून त्यांचा शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाला आहे. अलीकडेच त्याचे सार्वजनिक आरोग्याचा दृष्टीकोन असलेले ‘कुंभ नाशिक-त्र्यंबकेश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील झाले आहे.

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्राच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. पहिल्या महिला मुख्य सचिव आणि पहिल्या महिला पोलिस महासंचालक अशा रीतीने आता राज्याचे प्रशासकीय आणि पोलिस प्रशासनाचे नेतृत्व महिलांकडे आहे, ही अभिमानाची, आनंदाची बाब आहे.

-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T01:57:54Z dg43tfdfdgfd