अन्नपूर्णांचा आधार -प्रेमाताई पुरव

गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा या लढाया प्रत्यक्ष मैदानावर लढणाऱ्या अनेक रणरागिणींनी पुढे स्त्रीवादी चळवळीला आकार दिला. प्रेमाताई पुरव हे त्यातील आघाडीवरचे नाव. मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. सामाजिक आणि राजकीय चळवळीचा एक व्यापक पट पाहिलेली आणि त्यात सक्रिय सहभाग असलेली खंदी कार्यकर्ती काळाच्या पडद्याआड गेली.

प्रेमाताई मूळच्या गोव्याच्या. लहानपणीच त्या गोवा मुक्ती संग्रामात उतरल्या. बंदुक चालवणे, बॉम्ब तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवणे, दारूगोळा लपवणे अशा क्रांतिकारी कामांत त्यांचा सहभाग असे. पोलिसांच्या गोळीबारात त्या जखमीही झाल्या; पण मागे हटल्या नाहीत. आधी गोवा पीपल्स पार्टी आणि नंतर कम्युनिस्ट पक्षाशी जोडल्या गेल्यावर त्या मुंबईत आल्या. गिरगावातले कम्युनिस्टांचे कम्युन तेव्हा प्रसिद्ध होते. कैफी आझमी, बलराज सहानी, अण्णाभाऊ साठे तिथे राहात. प्रेमाताई या कम्युनमध्ये राहू लागल्या. मुंबईत कामगार चळवळ जोमात असल्याने येथे त्यांच्या कामाला आणखी धुमारे फुटले. कॉ. डांगे यांच्या स्टडी सर्कलला त्या हजेरी लावत. त्यांचे विचार आणि तत्त्वे पक्की झाली ती या वर्गांत. गिरणी कामगारांसोबत काम करताना त्यांच्या कुटुंबातल्या कष्टाने पिचलेल्या, गांजलेल्या स्त्रिया त्यांनी पाहिल्या आणि त्यांना सक्षम करण्याच्या ऊर्मीतून उभे राहिले ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’. बचत गट आणि मायक्रो फायनान्स ही नावेही माहीत नव्हती तेव्हा ‘अन्नपूर्णा’ने महिलांचे गट करून बँकांकडून कर्ज मिळवले होतं. १९८२च्या गिरणी कामगार संपात कामगारांची अनेक कुटुंबे ‘अन्नपूर्णा’च्या बळावर तगली. हिंसाचारग्रस्त महिलांना आधार देणे, शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी निवारा या कामांतही प्रेमाताईंचा सहभाग होता. मुलाला आईचे नाव लावता येणे, घरावर पती-पत्नींची नावे अशा आज प्रत्यक्षात आलेल्या गोष्टींसाठी प्रेमाताईंनी दीर्घकाळ आवाज उठवला. महागाई प्रतिकार समितीत अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे यांच्यासह प्रेमाताईही आघाडीवर होत्या. स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा मार्ग त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातून जातो, हे ओळखून ती वाट रुळवण्यात प्रेमाताईंचा मोलाचा वाटा आहे. या लढवय्यीला अभिवादन!

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T07:36:22Z dg43tfdfdgfd