PASSWORD SAFETY: 17 टक्के भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत बेफिकीर; सर्वेक्षणातून आले समोर

भारतीय नागरिकांनी त्यांच्या आर्थिक पासवर्डबाबत निष्काळजी असल्याचे एका सर्वेक्षणातून हे समोर आले आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेच्या ताज्या अहवालानुसार, नुकत्याच करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, प्रत्येक सहावा भारतीय आपले महत्त्वाचे आर्थिक पासवर्ड असुरक्षित पद्धतीने सेव्ह करतो.

१७ टक्के भारतीय करतात ‘असुरक्षित’ पद्धतीने पासवर्ड सेव्ह

सामान्यपणे एटीएम, डेबिट/क्रेडिट कार्डच्या पासवर्डबाबत लोक बेफिकीर आहेत.सर्वेक्षणातून समोर आले आहे की, सुमारे १७ टक्के लोक एटीएम, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, बँक खाती आणि ॲप स्टोअरचे महत्त्वाचे पासवर्ड ‘असुरक्षित’ पद्धतीने सेव्ह करतात.

डेटा चोरीचा धोका वाढतो.

बहुतेक लोक या खात्यांचे पासवर्ड त्यांच्या मोबाईल फोनवरील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जोडून सेव्ह करतात, तर काही लोक असे पासवर्ड नोटपॅडवर सेव्ह करतात. भारतीय नागरिक या प्रकारे पासवर्ड सेव्ह करत असल्याने डेटा चोरीचा धोका वाढतो.

इतरांसोबत पासवर्ड शेअरिंग

34 टक्के लोक इतरांसोबत पासवर्ड शेअर करतात 367 जिल्ह्यांतील 48,000 हून अधिक प्रतिसादकर्त्यांनी लोकल सर्कील्सनी केलेल्या या सर्वेक्षणात भाग घेतला. सर्वेक्षणानुसार, 34 टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते त्यांचे पासवर्ड इतरांसोबत शेअर करतात.सर्वेक्षणानुसार, जवळजवळ दोन तृतीयांश लोकांनी सांगितले की ते महत्त्वाचे पासवर्ड त्यांच्याकडे ठेवतात, तर उर्वरित 34 टक्के लोक म्हणाले की ते पासवर्ड शेअर करतात.

बँक फसवणुकीत 300 टक्क्यांनी वाढ

लोकल सर्कील्सनी एका निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी मे महिन्यात रिझर्व्ह बँकेने उघड केले होते की गेल्या दोन वर्षांत बँक फसवणुकीत 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कुटुंब किंवा मित्रांसोबत शेअर केला जातो पासवर्ड

सर्वेक्षणाचा भाग असलेल्या लोकांनी सांगितले की, मुख्यतः कुटुंबातील एक किंवा अधिक सदस्यांसोबत पासवर्ड शेअरिंग होते. तर काहीजण ते घरातील किंवा कार्यालयातील कर्मचारी आणि मित्रांसोबत शेअर करतात.

अनेकांना आर्थिक फसवणुकीचा अनुभव

सर्वेक्षणामध्ये 53 टक्के प्रतिसादकर्त्यांनी असे नोंदवले आहे की एकतर त्यांनी किंवा कुटुंबातील जवळच्या सदस्याने गेल्या पाच वर्षांत आर्थिक फसवणुकीचा अनुभव घेतला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T12:15:08Z dg43tfdfdgfd