DENGUE OUTBREAK: अनेक देशांमध्ये डेंग्युचा हाहाकार, भारतातही सतर्कतेचा इशारा

Dengue outbreak: जगातील अनेक देश गेल्या काही महिन्यांपासून डासांमुळे पसरणाऱ्या गंभीर आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. वेबएमडीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, या वर्षी जागतिक स्तरावर अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये डेंग्यूची प्रकरणे विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. ब्रेकबोन फिव्हर किंवा डेंग्यू म्हणून ओळखला जाणारा हा आजार काही गंभीर प्रकरणामध्ये प्राणघातक ठरू शकतो.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डेंग्युचा प्रसार वाढत चालला असून, यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या वाढत आहेत. गंभीर प्रकरणात रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याने या आजाराला हलके घेतले जाऊ नये, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

सीडीसीने दिलेल्या अहवालानुसार या वर्षीआधीच, 745 यूएस प्रवाशांना डेंग्यू तापाचे निदान झाले आहे. अमेरिकेतील पोर्तो रिकोमध्ये या आजाराने सुमारे 1,500 लोकांना संक्रमित केले आहे, ज्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्याची माहिती समोर आली आहे.

CDC अलर्ट

CDC च्या सर्वात अलीकडील डेटानुसार, यूएस मध्ये 2010 ते 2017 पर्यंत वार्षिक डेंग्यू प्रकरणांची सरासरी संख्या 626 होती. डेंग्यूग्रस्त राज्यांमध्ये प्रवास केलेल्या किंवा अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक धोका असल्याचे दिसून आले आहे.

अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका

डेंग्यूच्या स्थितीची वेळीच काळजी न घेतल्यास अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अवयव निकामी होण्याचा धोका वाढू शकतो. ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत त्या ठिकाणी प्रतिबंध करण्याबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.

भारतातही सवधानतेचा इशारा

भारतात मान्सून सुरू झाला असून हा ऋतू डासांच्या उत्पत्तीसाठी सर्वात अनुकूल मानला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच महाराष्ट्रातील अनेक शहरे आणि जवळपासच्या शहरांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची नोंद आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या वर्षी मे महिन्यापर्यंत महाराष्ट्रात सुमारे 1800 लोकांना डेंग्यूचे निदान झाले होते. तसेच रूग्णालयांमध्ये बाधितांची गर्दी वाढताना दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे सर्वांनीच सावध राहण्याची गरज आहे.

डेंग्यू कसा टाळायचा?

  • डेंग्यूचे डास सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वाधिक सक्रिय असतात, ते रात्रीही चावू शकतात. डास चावणे टाळण्यासाठी संरक्षणात्मक कपडे घाला.
  • लांब बाहींचा शर्ट आणि पँट घाला.
  • डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून घराभोवती घाण किंवा पाणी साचू देऊ नका.
  • भांडी, कूलरचे पाणी किंवा रिकाम्या भांड्यांमध्ये पाणी सचून देऊ नका.
  • शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सतत पोषक आहार आणि व्यायाम करत राहा.

(Disclaimer: वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे, हा कोणत्याही वैद्यकीय मताचा किंवा उपचाराचा पर्याय नाही. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

2024-07-01T12:15:01Z dg43tfdfdgfd