‘दीक्षाभूमी’चा प्रक्षोभ

माणसांना उपाशी ठेवून मुंग्यांना साखर घालणारी कुप्रथा ज्या मातीने भिरकावून दिली, ती भूमी म्हणजे दीक्षाभूमी. बौद्ध अनुयायांचे ऊर्जास्थळ म्हणून जगभरात दीक्षाभूमीचा लौकिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन स्वाभिमानाने जगण्याची नवदिशा दिली. त्या पवित्र परिसराने सोमवारी अचानक अनुयायांचा प्रक्षोभ अनुभवला.

शेकडोंच्या संख्येत आलेल्या भीमसैनिकांनी या भूमीवरील प्रस्तावित भूमिगत वाहनतळाचे काम बंद पाडले. प्रेरणाभूमीची पार्किंगभूमी होऊ न देण्याचा संकल्प प्रत्येकाच्या मुखातून व्यक्त होत होता. दीक्षाभूमी स्मारक समितीने संवादी भूमिका टाळल्याने आणि एकूणच पारदर्शकता न दाखविल्याने हा तिढा चिघळल्याचा अनेकांचा आरोप आहे. सौदर्यीकरण आणि नूतनीकरण प्रकल्पातून दीक्षाभूमीच्या ऐतिहासिक स्तुपाला, बोधीवृक्षाला हानी पोहोचेल, अशी अनेकांना दाट शंका आहे. एक लाख चौरस फुटांच्या जागेतील भूमिगत वाहनतळाची गरज काय, असाही प्रश्न काहींनी उपस्थित केला. या कामासाठी राज्य सरकारने दोनशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. बांधकामाची भव्यता बघून दर्शनार्थींमधील अस्वस्थता वाढीस लागली होती. आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा उद्वेग बोलण्यातून झळकत होता. मोठमोठ्या यंत्रांच्या साक्षीने ढिगारे उपसले जाऊ लागताच भडका उडाला. आंदोलकांनी घोषणा देत बांधकामाची मोडतोड केली. लाकडी साहित्य जाळून टाकले. स्मारक समिती आणि अनुयायांच्या सहमतीनंतरच काम सुरू होईल, अशी नि:संदिग्ध घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

समितीनेही कामाच्या स्थगितीची ग्वाही दिली. या परिसरात अजूनही अदृश्य तणाव आहे. सर्व रस्ते अडविण्यात आले असून मुख्य स्थळावर संचारबंदीसदृश वातावरण आहे. संतापाचा कडेलोट झाला असतानाही दीक्षाभूमीच्या वास्तूवर क्षुब्धतेचा ओरखडा उमटणार नाही, याची काळजी आंदोलकांनी घेतली. नेत्यांच्या, निर्णयकर्त्यांच्या नजरेतून ही अंतस्थ कळकळ का निसटावी, हा खरा प्रश्न आहे. दीक्षाभूमी हे राष्ट्रीय स्थळ आहे. तेथील स्थानमाहात्म्य टिकविण्यासाठी आक्रमकता, अनागोंदी आणि असमन्वय टाळलेला बरा. तिथे राजकारणाला थारा नकोच. सर्वांनीच संयम दाखविला तर सहमती होईल. तोडगाही निघेल. ज्या भूमीने अनाथांना भान दिले, नि:शब्दांना वाणी दिली, त्या परिसरातील चिथावणी आणि विसंवादाचा अस्त होईल, अशी कामना करू या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T07:36:22Z dg43tfdfdgfd