MUMBAI CENTRAL PUBLIC PARK : न्यूयॉर्क, लंडनसारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ लवकरच मुंबईत

मुंबई : मुंबई किनारी रस्ता आणि महालक्ष्मी रेसकोर्स अशा ३०० एकरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२० एकर जागा आणि त्यासोबत मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील १७५ एकर क्षेत्र असं संपूर्ण मिळून जवळपास ३०० एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१२० एकर जागा मुंबई महानगरपालिकेला

महालक्ष्मी रेसकोर्स भूखंडावरील एकूण २११ एकरपैकी सुमारे ९१ एकर भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना देण्याच्या करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या. या भाडेपट्टा करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २ जुलै २०२४ रोजी स्वाक्षरी करण्यात आली.

महालक्ष्मी रेसकोर्स भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर एकूण भूखंडापैकी १२० एकर भूखंड शासनाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास महाराष्ट्र शासनाने अलीकडे मान्यता दिली. तर उर्वरित ९१ एकर भूखंड मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. हा भाडेपट्टा करार दिनांक १ जून २०२३ पासून ते दिनांक ३१ मे २०५३ या ३० वर्षांच्या कालावधीसाठी आहे. ९१ एकर भाडेपट्ट्याने दिल्यानंतर उर्वरित सुमारे १२० एकर जागा आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आली आहे.

भाडेकरार संपल्यानंतर महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न

मागील १०० वर्षांपासून महालक्ष्मी रेसकोर्स येथील २११ एकर क्षेत्राचा भूखंड मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना मक्ता कराराने देण्यात आला होता. या जागेचा भाडेपट्टा करार काही वर्षांपूर्वी संपल्यानंतर हा भूखंड व्यापक नागरी हिताच्या दृष्टीने पुन्हा ताब्यात घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

९१ एकर जागा मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना सुपूर्द केल्यानंतर इतर १२० एकर जागा तसेच रेसकोर्स परिसरामध्ये लागून असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील १७५ एकर जागा असे दोन्ही मिळून जवळपास ३०० एकरवर न्यूयॉर्क, लंडन या शहरांच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आता वेग दिला जाईल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-03T14:37:52Z dg43tfdfdgfd