‘१५ मिनिटवाली’ शहरे

- डॉ. मेघश्री दळवी

जागतिक तापमानवाढीच्या होरपळीस आळा घालायचा, तर कार्बन उत्सर्जन कमीत कमी करणारी जीवनशैली हवी आणि त्यासाठी येत आहेत, ‘पंधरा मिनिटवाली शहरे’. बहुतांशी सेवासुविधा १५ मिनिटांच्या चालण्याच्या किंवा सायकलिंगच्या अंतराच्या आत असतील, अशी शहरे ही भविष्याची गरज आहे. आज बरीच कामे ऑनलाइन होतात. ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधाही उपलब्ध आहे. घराजवळ नोकरी किंवा नोकरीच्या ठिकाणाजवळ भाड्याने घर हा दृष्टिकोन रुजत आहे. त्यामुळे उद्या ‘पंधरा मिनिटांची शहरे’ निश्चितच उभी राहतील. त्यात व्यावसायिक काम, रहिवास, शिक्षण, खरेदी, आरोग्य आणि मनोरंजन सर्व काही जवळ असेल. आज दहा टक्के कार्बन उत्सर्जन रोजच्या प्रवासामुळे घडते, ते या शहरांमुळे घटवता येईल. वाहनांच्या इंधनांमुळे पर्यावरणावर विविध प्रकारे पडणारा भार कमी करता येईल.

करोना महासाथीचा काळ आठवला, तर सर्व सोयी जवळ असण्याचे फायदे लक्षात येतील. चालण्याचा किंवा सायकलिंगचा व्यायाम होईल. प्रवासाचा वेळ वाचल्याने इतर छंदांकडे लक्ष देता येईल. सामाजिक भावना वाढीस लागेल आणि जीवनशैली अधिक सकारात्मक होईल. पॅरिस आणि न्यूयॉर्क यांसारख्या काही शहरांमध्ये यासाठी आर्थिक तरतूद करण्यास सुरुवात झाली आहे. सिएटल आणि मिलान या शहरांमध्ये चालणे आणि सायकलिंग यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होत आहे. काही मोठ्या कंपन्यांनी एकाच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सॅटेलाइट ऑफिसची कल्पना उचलून धरली आहे. त्याने प्रत्येकाला घराजवळील ऑफिस निवडायची संधी मिळेल.

चालत पूर्ण शहर फिरता येईल, अशी ‘वॉकेबल सिटी’ची कल्पना नवीन नाही. युरोपमध्ये काही शहरे अशी आहेत. उद्या पंधरा मिनिटांची शहरे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतील. त्यांना सौर आणि पवन यांसारख्या शाश्वत ऊर्जेची आणि स्मार्ट तंत्रज्ञानाची साथ मिळाली, तर तिथे आयुष्य सुखकर होऊ शकते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T06:43:28Z dg43tfdfdgfd