SUNITA KEJRIWAL NEWS : केजरीवालांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप; जेलमध्ये माझ्या पतीचा होतोय छळ

सध्या ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा छळ केला जात असल्याच आरोप केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनी केला आहे. केजरीवाल यांना आज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात उपस्थित करण्यात आलं होतं. यावेळी सुनीता केजरीवाल या सुद्धा राऊज अॅव्हेन्यू कोर्टात हजर होत्या. केजरीवाल यांची तब्येत ठीक नसल्याचा आरोप सुनीता यांनी यावेळी केला. कोर्टाने केजरीवाल यांच्या कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. 'अरविंद केजरीवाल यांची तब्येत ठीक नाही. मुख्यमंत्र्यांना त्रास दिला जातोय' असं सुनीता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

सुनावणीदरम्यान केजरीवाल यांनी स्वत: बाजू मांडली. ‘आम आदमी पक्षाला चिरडण्याचा ईडीचा हेतू असल्याचा आरोप केजरीवाल यांनी कोर्टात केला. उत्पादन शुल्क धोरणाच्या खटल्यात केवळ चार साक्षीदारांनी माझं नाव घेतलं आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी चार जणांचे जबाब पुरेसे आहेत का?’ असा सवाल केजरीवाल यांनी कोर्टात केला. 'सहआरोपी आणि सरकारी साक्षीदार शरतचंद्र रेड्डी यांनी भाजपला ५५ कोटी रुपयांची देणगी दिल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. अटकेनंतर त्यांनी हा निधी दान केल्याने पैशांचा व्यवहार सिद्ध झाला आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी न्यायालयात सांगितले. 'आप' पक्ष भ्रष्ट असल्याचा आभास देशात निर्माण करण्यात आला असून, ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तपासात सहकार्य करू इच्छितात, असं केजरीवाल यांचे वकील रमेश गुप्ता यांनी कोर्टाला सांगितलं. दरम्यान, आज ईडीकडून केजरीवाल यांचे नवीन रिमांड याचिका दाखल करण्यात आली. केजरीवाल यांचे कोठडीत चौकशीदरम्यान पाच दिवस जबाब नोंदविण्यात आले. परंतु ते प्रश्नांची टाळाटाळ करणारी उत्तरे देत होते, असं ईडीने आपल्या नव्या रिमांड याचिकेत म्हटलं आहे.

दिल्ली राज्याच्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. या प्रकरणात केजरीवाल यांच्यासह 'आप'चे नेते, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि 'आप'चे राज्यसभा खासदार संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत.

2024-03-28T12:34:04Z dg43tfdfdgfd