LEOPARDS NEWS : न्हावरे परिसरातील बिबट्या जेरबंद!

न्हावरे : पुढारी वृत्तसेवा : न्हावरे (ता.शिरूर) परिसरातील सोनवणे वस्ती येथे महादेव सोनवणे यांच्या घराशेजारील गोठ्याजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात रविवारी (दि. 28) पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याचे वनाधिकारी अमोल चव्हाण यांनी सांगितले. बिबट्याने शुक्रवारी (दि. 26) महादेव सोनवणे यांच्या बोकडाला ठार केले होते. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावला. त्यात बिबट्या अडकला. बिबट्याच्या आवाजाने महादेव सोनवणे व रवींद्र सोनवणे यांनी पाहिले असता आणखी एक बिबट्या पिंजर्‍या बाहेर उभा असल्याचे त्यांना दिसले.

सोनवणे यांनी आवाज केल्याने त्याने अंधारात धूम ठोकली. गेल्या दोन वर्षांपासून सोनवणे वस्तीवरील महादेव सोनवणे व उत्तम सोनवणे यांच्या शेळ्या, मेंढ्या तसेच पाळीव कुत्री बिबट्याने ठार केली. बिबट्याच्या दहशतीने या परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. वनविभागाने सोनवणे वस्ती परिसरात पिंजरा लावून दुसर्‍या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रहार पतसंस्थेचे शिरूर तालुकाध्यक्ष दत्तात्रय तरटे व ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा

2024-04-29T09:11:44Z dg43tfdfdgfd