राजस्थानात ‘काँटे की टक्कर’

अजय सेतिया (विश्लेषण)

राजस्थानमध्ये यावेळी भाजप आणि काँग्रेस या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये तीव्र चुरस दिसून येत आहे. 2014 आणि 2019 मध्ये या राज्यात भाजपने सर्व म्हणजे 25 जागा जिंकून क्लीन स्वीप केला होता.

राजस्थानमध्ये 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 12 मतदार संघांत मतदान झाले होते. त्यातील चुरू, सिक झुंझुनू, नागोर, अलवर आणि दौसा या ठिकाणी चुरस पाहायला मिळाली. हे मतदार संघ जाटबहुल आहेत. अलवर मतदार संघातून भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना मैदानात उतरवले आहे. ते मूळचे हरियाणाचे आहेत. काँग्रेसने त्यांच्या विरोधात ललित यादव यांना उमेदवारी दिली आहे. भूपेंद्र यादव भूमिपुत्र नसल्याचा मुद्दा काँग्रेसने प्रचारात लावून धरला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने श्रीराम मंदिर, 370 कलम रद्दबातल केले आणि मोदींची गॅरंटी हे मुद्दे पुढे आणले.

दुसर्‍या टप्प्यात राजस्थानमध्ये तेरा मतदार संघांत मतदान झाले. त्यातील पाली, भिलवाडा, राजसमंद, उदयपूर, अजमेर, झालावाड या सर्व जागा भाजपसाठी सुरक्षित मानल्या जातात. येथे भाजपला मानणारा मोठा परंपरागत मतदार आहे. मात्र, दुसर्‍या टप्प्यातही काँग्रेसने भाजपपुढे आव्हान उभे केले, हे नाकारता येणार नाही.

बाडमेर-जैसलमेर मतदार संघात अपक्ष उमेदवार रवींद्र सिंह भाटी यांना मिळणारी मते निर्णायक ठरू शकतात. त्यानुसार जय-पराजयाचा लंबक वर-खाली होईल, असे चित्र दिसते. राजपूत समाज आणि मूळ ओबीसी समाजाची मते त्यांना मिळू शकतात.भाजपने येथून खासदार कैलाश चौधरी आणि काँग्रेसने बेनीवाल यांना मैदानात उतरविले आहे. चितौडगढ मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी रिंगणात आहेत.

काँग्रेसने त्यांच्या विरोधात माजी मंत्री उदयलाल आंजना यांना संधी दिली आहे. ते तब्बल सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. टोंक-सवाई माधोपूर मतदार संघातून भाजपने विद्यमान खासदार सुखबीर सिंह जोनापुरिया यांना, तर काँग्रेसने आमदार हरीश मीणा यांना संधी दिली आहे. ही लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी गुर्जर आणि मीणा समाजाची मते निर्णायक ठरू शकतात. कोटा मतदार संघातून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला मैदानात उतरल्यामुळे या जागेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रल्हाद गुंजल यांचे आव्हान बिर्ला यांच्यापुढे आहे. हे दोन्ही उमेदवार ताकदवान मानले जातात.

माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव रिंगणात

जालोर-सिरोही मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव हे काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरले आहेत. ते गेल्या निवडणुकीत जोधपूरमधून पराभूत झाले होते. गेहलोत हे माळी समाजातून येतात आणि या मतदार संघात माळी समाजाची मते महत्त्वाची आहेत. असे असले तरी हा समाज भाजपचा समर्थक मानला जातो. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला येथे 2 लाख 61 हजार मतांच्या फरकाने हार पत्करावी लागली होती.

झालवाडा मतदार संघात माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे चिरंजीव दुष्यंत सिंह भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरले आहेत. त्यांना विजयी होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. याखेरीज जोधपूर मतदार संघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस दिसून येते. बासवाडा या आदिवासीबहुल मतदार संघात भाजपने महेंद्रजित सिंह मालवीय यांना रिंगणात उतरवले आहे. ते गेहलोत मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांची बाजू भक्कम असल्याचे दिसून येते.

2024-04-29T12:12:12Z dg43tfdfdgfd