सर्वात लांब काश्मिरी गालिचा

श्रीनगर : काश्मिरी शाल आणि गालिचे देश-विदेशात लोकप्रिय आहेत. आता जम्मू-काश्मीरच्या हस्तकला कारागिरांनी एक थक्क करणारी कामगिरी केली आहे. त्यांनी आठ वर्षे मेहनत घेऊन तब्बल 72 फूट लांबीचा गालिचा बनवला आहे. यासाठी 25 कारागिरांनी मेहनत घेतली. उत्तर काश्मीरच्या क्राल पोरा परिसरातील वायल नावाच्या गावातील कारागिरांनी हा सुंदर गालिचा बनवला आहे. हा जगातील सर्वात मोठा हस्तनिर्मित गालिचा असल्याचे मानले जात आहे.

हातानेच विणलेला हा सुंदर गालिचा 72 फूट लांब आणि 40 फूट रुंदीचा आहे. तो एकूण 2,880 चौरस फुटांची जागा व्यापतो. फैयाज अहमद शाह आणि अब्दुल गफ्फार शेख या दोन अनुभवी कारागिरांच्या मार्गदर्शनाखाली हा गालिचा तयार करण्यात आला. आपल्याच देशातील एका व्यक्तीने असा गालिचा बनवण्याची ऑर्डर दिली होती, असे फैयाज यांनी सांगितले.

काश्मीर खोर्‍यात इतका मोठा गालिचा आतापर्यंत कधीही बनवण्यात आला नव्हता. हा गालिचा विणण्यासाठीही मोठ्या जागेची गरज होती. अनेक बारीकसारीक गोष्टींकडेही विशेष लक्ष द्यावे लागत होते. कोरोना महामारीच्या काळात या गालिचाचे काम सुरू ठेवण्यात अनेक अडचणी आल्या. लॉकडाऊनमुळे माल पुरवठ्यामध्येही व्यत्यय येत होता. अखेर आठ वर्षांनी हा विशाल गालिचा पूर्ण झाला. या गालिचामुळे आता असे अनेक कारागिर पुन्हा आपले काम सुरू करू लागले आहेत. फैयाज यांनी सांगितले की, सुमारे 226 कारागीर आमच्याकडे पुन्हा परत आले आहेत.

2024-04-27T04:03:09Z dg43tfdfdgfd