तडका : कर्तव्यतत्परता

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. संसदेच्या निवडणुका देशभर होऊ घातल्या आहेत. तीन टप्पे संपून चौथ्या टप्प्यात, पाचव्या टप्प्यात आणि थेट सातव्या टप्प्यापर्यंत मतदान चालणार आहे. राजकीय पक्षांची कुरघोडी, चाली, डावपेच, शह-काटशह यांची चर्चा रंगात आलेली आहे. एकदाच्या निवडणुका पार पडल्या की, मग कोण निवडून येणार, पुढे सरकार कसे बनणार, याच्या चर्चा रंगत जातील; परंतु या रणधुमाळीत सर्वात मोठे काम करणारे घटक म्हणजे निवडणूक कर्मचारी होय. लोकशाहीच्या या उत्सवात महत्त्वाचे योगदान देणार्‍या सर्व निवडणूक कर्मचार्‍यांना मानाचा मुजरा.

इलेक्शन ड्युटी लागू नये असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तरीही आयोगाचाही नाइलाज असल्यामुळे वेगवेगळ्या खात्यांमधून कर्मचारी एकत्र करून त्यांना आदेश दिला जातो. एकदाचा आदेश आला की, काहीतरी खटपट करून ड्युटी रद्द करता येईल का, याचे प्रयत्न केले जातात. पहिल्या आदेशासोबतच प्रशिक्षणाच्या तारखा दिलेल्या असतात. प्रशिक्षणादरम्यान टीमचा शोध घेऊन एकदाचे हे पाच कर्मचारी एकमेकांना भेटतात. केंद्राध्यक्ष सर्वाधिक तणावात असतात, कारण त्या मतदान केंद्रावरील मतदान सुखरूप पार पाडण्याची जबाबदारी त्यांची असते. बरेचदा केंद्राध्यक्ष तरुण असतो आणि त्याच्या अधिनस्त दोन दिवस काम करणारा कर्मचारी हा वयाने अधिक असतो. अशावेळी केंद्राध्यक्षाला त्याच्याशी जुळवून घ्यावे लागते, त्याला मान द्यावा लागतो. एखादा नुकताच नोकरीला लागलेला नवतरुण वांड पोरगा टीममध्ये असेल तर त्याला पण चुचकारत त्याच्याकडून काम करून घ्यावे लागते. परस्परांशी कोणताही पूर्वपरिचय नसलेले 6 ते 7 लोक एकत्र येतात आणि त्यांचा एक संघ तयार होतो.

यांच्यामध्ये एक भावबंध तयार होतो आणि असे असंख्य संघ किंवा टीम्स तयार होऊन ते ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असतात. स्वतःच्या खात्यामध्ये सचोटीने काम करत त्यांची नोकरी सुरू असते; पण निवडणूक प्रक्रिया राबवणे किंवा इलेक्शन ड्युटी पूर्ण करणे हे मात्र प्रत्येकाला धोकादायक वाटत असते. याचे कारण म्हणजे इथे चुकीला क्षमा नसते.

ही टीम तयार करण्यापूर्वी विभागीय निवडणूक अधिकारी म्हणजेच झोनल ऑफिसर्स कामाला लागले असतात. निवडणूक जाहीर झाल्याबरोबर सर्व झोनल ऑफिसर्सना अंतर्गत असणार्‍या प्रत्येक मतदान केंद्रावर भेट देऊन तिथे सर्व काही व्यवस्थित आहे का, याची पाहणी करावी लागते. यात मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था हे पाहणे झोनल ऑफिसरचे काम असते. झोनल ऑफिसरच्या टीममध्ये काही कर्मचारी दिलेले असतात.

अतिरिक्त दोन-तीन मशिन यांच्याकडे ठेवलेल्या असतात आणि कुठे एखाद्या मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला तर तत्काळ तिथे पोहोचून दुसरी मशिन देण्याचे महत्त्वाचे कार्य असते. त्याचबरोबर त्यांना दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी केंद्राध्यक्षांकडून घेऊन आयोगाकडे पाठवायची असते. सगळ्यात पहिल्यांदा येतो तो निवडणूक आयोगाचा आदेश. त्या जिल्ह्यापुरते जिल्हाधिकारी म्हणजेच कर्मचार्‍यांसाठी निवडणूक आयोग असतो. निवडणूक ही लोकशाहीचा आत्मा असेल, तर हे शासकीय कर्मचारी आणि अनुदानित संस्थांचे, शाळांचे कर्मचारी हे खरे या निवडणुकांचे योद्धे असतात. एकदाचे मतदान आटोपल्यानंतर निर्धारित जागेवर जाऊन मतपेटी दिल्यानंतर थकलेले कर्मचारी घरी जाऊन झोपतात.

2024-05-08T03:51:38Z dg43tfdfdgfd