CLAUDIA SHEINBAUM : काचेचे छत तोडले!

-डॉ. मोहन द्रविड मेक्सिको म्हणजे मर्दानी अहंकारासाठी (machismo) जगभर ओळखला जाणारा देश. अशा या देशाच्या अध्यक्षपदी एक महिला निवडून यावी, हे आधुनिक जगतातील मोठे आश्चर्यच म्हटले पाहिजे. अध्यक्षपदी निवडून आलेल्या त्या महिलेचे नाव क्लॉडिया शेनबॉम. सन २०१६मध्ये झालेल्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या बोलण्यात ‘काचेच्या छता’चा उल्लेख सतत येत असे. महिलांना उच्चपदी जाण्यात जो अडथळा येतो, त्याला काचेच्या छताची उपमा दिली जायची. या छतावर पुरुषांचे राज्य असायचे, आणि तिथे चाललेला कारभार स्त्रियांना दिसत असला तरी त्यांना त्यात भाग घेता येत नसे. हे काचेचे छत तोडण्यात क्लॉडिया शेनबॉम यांनी आश्चर्यकारक यश मिळवले आहे.

हे आश्चर्य एवढ्यापुरते सीमित नाही; पुढेसुद्धा आहे. क्लॉडिया शेनबॉम या धर्माने आणि वंशाने ज्यू आहेत. १३ कोटी लोकसंख्या असलेल्या मेक्सिकोत बहुसंख्य कॅथलिक आहेत. तेथील गावांतले वातावरण साधारणतः आपल्या गोव्यासारखे असते. १३ कोटी लोकसंख्येचा मेक्सिकोत ज्यूंची संख्या जेमतेम ५० हजार असेल. तरीही क्लॉडिया या निवडून आल्या. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या शास्त्रज्ञ आहेत. खरे म्हणजे, त्यांचे कुटुंबच शास्त्रज्ञांचे आहे. त्यांचे आई, वडील, भाऊ सर्वच शास्त्रज्ञ आहेत. क्लॉडिया यांची पदवी उर्जा इंजिनिअरिंगमधली आहे आणि त्यांनी त्यांचा पीएच्.डी.चा प्रबंध १५ नोबेल पारितोषिके मिळालेल्या लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेत लिहिला आहे.

अमेरिकेसारख्या देशात कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक महिला सर्वोच्चपदी पोहोचलेल्या असल्या तरी अजूनही तेथील राष्ट्राध्यक्षपदाचा विचार करता तेथेही काचेचे छत आजवर अभेद्यच राहिले आहे. त्या मानाने भारत खूपच पुढारलेला. इंदिरा गांधी यांनी भारताच्या राजकारणातले काचेचे छत सन १९६६मध्येच भेदले. अमेरिकेत बराक ओबामा यांचे राज्य आले तरी हिलरी क्लिंटन यांचे लक्ष त्या काचेच्या छताकडे होते. त्यांनी हट्टाने परराष्ट्रमंत्रिपद आपल्याकडे घेतले. पण त्या काळातली अमेरिकेची परराष्ट्राबाबतची अनेक धोरणे चुकीची ठरली. या चुका आणि त्यांचा अनाठायी आत्मविश्वास या कारणांमुळे हिलरी या २०१६ची अध्यक्षीय निवडणूक हरल्या. अमेरिकेतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तेथे नजिकच्या भविष्यकाळात तरी काचेचे छत फुटण्याची शक्यता कमीच दिसते.

हिलरी क्लिंटन या त्यांचे यजमान बिल क्लिंटन यांच्या वकील झाल्या होत्या. अनेक सरकारी धोरणे आखण्यात आणि ती राबवण्यात हिलरी यांनी अध्यक्ष बिल यांना मदत केली होती. अनेक जण तेव्हा हिलरी यांना ‘बिल क्लिंटन यांची प्रेरणाशक्ती’ म्हणत असत. बिल क्लिंटन हे सन २०००मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर लगेचच त्यांच्या जागेवर दावा सांगणे हिलरी यांना प्रशस्त वाटले नाही. तेव्हा त्या वर्षी त्यांनी आपली राजकीय विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी न्यूयॉर्क राज्यातून सेनेटची जागा लढवली आणि प्रचंड बहुमताने जिंकली. सन २००८मध्ये त्या पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीच्या शर्यतीत उतरल्या. त्यावेळी त्यांची लढाई होती ती बराक ओबामा यांच्याशी. पहिला कृष्णवंशीय उमेदवार, की पहिली महिला उमेदवार, अशा कचाट्यात त्यांचा पक्ष सापडला. शेवटी हिलरी यांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर क्लॉडिया यांच्या विजयाकडे बघावे लागेल. क्लॉडिया शेनबॉम यांचा मेक्सिको हा देश अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. तो भौगोलिक दृष्ट्या जरी उत्तर अमेरिका खंडात असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या दक्षिण अमेरिका खंडात आहे. म्हणून त्या सर्वांना मिळून लॅटिन अमेरिका म्हणण्याची पद्धत आहे. युरोपीय आक्रमकांनी पश्चिम गोलार्धातील काबीज केलेल्या देशांपैकी मेक्सिको हा पहिला देश. तत्पूर्वी इथे ‘माया’ (इ.स.पू. तिसरे शतक) आणि ‘एजटेक’ (इ.स. चौदावे ते सोळावे शतक) या मोठ्या संस्कृती होऊन गेल्या. येथील ८० टक्के किंवा अधिक लोक गोरे आणि मूळ रहिवासी यांपासून झालेली संमिश्र प्रजा आहे. यांचा वर्ण आणि शरीरयष्टी साधारण आपल्या येथील लोकांप्रमाणेच आहे. जेव्हा ‘गदर पक्षा’चे क्रांतिकारक आणि महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. पांडुरंग खानखोजे यांच्यावर अमेरिकेने सन १९२१ मध्ये अटकवॉरंट काढले आणि ते मेक्सिकोत पळून गेले तेव्हा तेथील लोकांमध्ये ते बेमालूमपणे मिसळू शकले. त्याच देशात पुढे ते शेतीतज्ज्ञ म्हणून नावाजले गेले. त्यांचा गौरव जगप्रसिद्ध चित्रकार डिएगो रिबेरा यांनी त्यांच्या गाजलेल्या एका भित्तीचित्रात केला आहे. त्या चित्रात डॉ. खानखोजे हे लहान बालकाच्या रूपातल्या मेक्सिकोला भाकरी तोडून देत आहेत, असे दाखवले आहे. सध्या मात्र तिथे भारतीयांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे.

मेक्सिकोचे अमेरिकेशी असलेले संबंध द्वेष आणि भीती यांवर आधारित आहेत. एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मेक्सिको हा आजच्या अमेरिकेच्या आकाराचा होता आणि अमेरिका आजच्या मेक्सिकोच्या. टेक्सास ते कॅलिफोर्नियापर्यंतची हल्लीची राज्ये तेव्हा मेक्सिकोमध्ये होती. त्या राज्यांची नावे आणि तेथील गावांच्या नावांवरून हे सहज समजून येते. सन १८४६ ते १८४८ या काळात अमेरिकेने मेक्सिकोशी युद्ध करून हा प्रदेश काबीज केला.

Find more statistics at Statista]]>

मेक्सिकोचे दरडोई वार्षिक उत्पन्न १३ हजार अमेरिकी डॉलर इतके आहे. स्त्री-पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७८/७१ वर्षे आहे. म्हणजे भारतापेक्षा तीन वर्षांनी अधिक. मेक्सिको आज आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करता ‘उच्च मध्यम वर्गा’त मोडतो. इतर विकसित देशांप्रमाणे मेक्सिकोत स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. ते तीन टक्क्यांनी अधिक आहे. उत्पादनक्षेत्र सकल उत्पन्नाचा ४० टक्के भाग व्यापते. मेक्सिको हा लॅटिन अमेरिकेचा कारखाना आहे. तो अमेरिका आणि कॅनडा यांच्याबरोबर मुक्त व्यापार संघटनेत आहे. त्यात बनणाऱ्या चिजा अमेरिकेतल्या देशी मालाच्या ३० टक्के स्वस्त मिळतात. म्हणून फोर्ड, जनरल मोटर्स यासारख्या अनेक अमेरिकी कंपन्यांनी आपले अमेरिकेतील कारखाने मेक्सिकोमध्ये हलवले आहेत. चीन आणि अमेरिका यांच्या भांडणात सर्वाधिक फायदा कुणाचा झाला असेल, तर तो मेक्सिकोचा. हे दोन्ही देश मेक्सिकोत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अमेरिकेला सर्वाधिक निर्यात करणारा देश म्हणून मेक्सिकोने या वर्षी चीनची जागा घेतली आहे. पण गंमत अशी, की मेक्सिकोच्या कारखान्यात बनणाऱ्या वस्तू खरे म्हणजे चिनी मालकीच्याच आहेत.

मेक्सिकोचे राजकारण आता अधिकाधिक डावीकडे झुकू लागले आहे. क्लॉडिया यांच्याकडे राजकीय सक्रियता आणि शासकीय अनुभव भरपूर आहे. विद्यार्थी असताना कोलंबियामधील अत्याचारी लष्करशाहीविरोधात त्यांनी भूमिगत क्रांतिकारक चळवळीत भाग घेतला होता. ज्यू असूनही क्लॉडिया यांनी इस्रायलला पाठिंबा देणे नाकारले, हे पाहता त्यांच्यावरील डाव्या राजकारणाचा प्रभाव कळतो. गेल्या वीस वर्षांत त्यांनी राज्यपालपद, मेक्सिको शहराचे महापौरपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सन २०२४च्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्यांना भरघोस बहुमत मिळाले आहे. गरिबी निर्मूलन, सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्यव्यवस्था, असे कार्यक्रम त्यांनी जाहीर केले आहेत. आपले पूर्वसुरी आम्लो यांच्यासारखाच बिनपगारी आणि सर्व राजकीय थाटामाटाचा त्याग करून राज्य चालवायचा इरादा क्लॉडिया यांनी व्यक्त केला आहे. क्लॉडिया यांच्यापुढील आव्हाने कठीण आहेत; मात्र, उच्च शिक्षण आणि राजकीय धोरणे या बळावर त्या या आव्हानांना समर्थपणे सामोऱ्या जातील, यात शंका नाही.

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-28T06:16:17Z dg43tfdfdgfd