क्रियाशील जाणकार - मुचकुंद दुबे

भारताच्या परराष्ट्र धोरणांना आपल्या कूट-कौशल्याने विधायक वळण देणाऱ्यांत आणि जागतिक व्यासपीठावर देशाचे अस्तित्व ठळक ठेवणाऱ्यांत मुचकुंद दुबे हे महत्त्वाचे नाव. ध्यास परराष्ट्र सेवेत असताना सर्वोत्तम देण्याचा आणि असोशी निवृत्तीनंतर अध्यापन-सामाजिक सक्रियतेद्वारे मनामनांत मानवी मूल्ये रुजविण्याची.

दुबे यांचा जन्म तत्कालीन बिहारमधील (आत्ता झारखंडमधील) देवघर या गावी सन १९३३मध्ये झाला. पाटणा विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. ऑक्स्फोर्ड आणि न्यू यॉर्क विद्यापीठांत अर्थशास्त्र विषयाचे सखोल अध्ययन केले. सन १९५७मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाल्यावर अल्पावधीतच त्यांनी कार्यकौशल्याची छाप पाडली. संयुक्त राष्ट्रांच्या जीनिव्हा कार्यालयात भारताचे कायस्वरूपी प्रतिनिधी, तसेच युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाचे भारतीय सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. एप्रिल १९९० ते नोव्हेंबर १९९१ असा त्यांचा परराष्ट्र सचिवपदाचा कार्यकाळ राजकीय अस्थिरतेचा. या काळात व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर आणि पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते. हा शीतयुद्धाचाही काळ होता. या काळात दुबे यांनी आपली भूमिका नेटाने पार पाडली. निवृत्तीनंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुमारे आठ वर्षे ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयाचे अध्यापन केले. ‘कौन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट’चे विद्यमान अध्यक्ष होते.

सी. डी. देशमुख हे १९६२ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, तर दुर्गाबाई देशमुख या पहिल्या कार्याध्यक्ष. दुबे हे ‘समान शाळा पद्धती’चे खंदे पुरस्कर्ते होते. बिहारच्या ‘समान शाळा पद्धती’च्या धोरणाची आखणी त्यांनी केली; मात्र ते प्रत्यक्षात आले नाही. ते सिक्कीमच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. ‘अन्‌इक्वल ट्रीटी : वर्ल्ड ट्रेंडिंग ऑर्डर आफ्टर जीएटीटी’ आणि ‘इंडियाज फॉरेन पॉलिसी : कॉपिंग विथ्‌ द चेंजिंग वर्ल्ड’ ही दुबे यांची महत्त्वाची पुस्तके. गत बुधवारी वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. आंतरराष्ट्रीय संबंधांची सखोल जाण असणारे आणि सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी सतत क्रियाशील राहिलेले मुचकुंद दुबे यांना आदरांजली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T06:13:20Z dg43tfdfdgfd