संजीव सिंह हा सराईत पेपरफोड्या

पाटणा/रांची; वृत्तसंस्था : नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी झारखंड पोलिसांनी शनिवारी देवघर येथून 6 जणांना ताब्यात घेतले. ताब्यातील सर्व जण बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील आहेत. बिहारमधील पाटणा येथे या सगळ्यांना नेण्यात येईल. झारखंडमधूनच नीटचा पेपर फुटल्याचा पुरावा उपलब्ध झाला आहे, असे बिहार आणि झारखंड दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रकरणाचा मास्टरमाईंड तसेच बिहारमधील नालंदा महाविद्यालयातील कर्मचारी संजीव सिंह ऊर्फ संजीव मुखिया हा सराईत पेपरफोड्या असल्याचे त्याच्या हिस्ट्रीवरून समोर आले आहे.

नीट परीक्षा 5 मे रोजी झाली होती. या दिवशी काही विद्यार्थी आणि केंद्रांपर्यंत पेपर पोहोचला होता. पोलिस अशाच एका केंद्रावर पोहोचले तेव्हा जळालेला एक पेपर सापडला. 6136488 हा क्रमांक नमूद असलेली परीक्षेशी संबंधित सामग्रीही पोलिसांनी जप्त केली आहे. हजारीबागमधील एका केंद्रात घडलेला हा प्रकार असल्याचे सांगण्यात येते. झारखंडमधूनच पेपर फुटल्याचे इथेच लक्षात आले.

एनटीए आणि शिक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना स्थानिक तपास यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईची आणि समोर आलेल्या तथ्यांची माहिती दिली आहे. ताब्यातील 6 जणांमध्ये परमजीत सिंह ऊर्फ बिट्टू, चिंटू ऊर्फ बलदेव कुमार, काजू ऊर्फ प्रशांत कुमार, अजित कुमार, राजीव कुमार ऊर्फ कारू आणि पिंकू कुमार यांचा समावेश आहे.

नूरसराय उद्यान महाविद्यालयातील कर्मचारी संजीव हा पेपरफोड टोळीचा म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही टोळी अनेक महिन्यांपासून पेपरच्या मागावर होती. एका प्राध्यापकाने संजीव याला व्हॉटस्अ‍ॅपवर पेपर पाठवला होता. नंतर पाटणा आणि रांची येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीने पेपर सोडविण्यात आला. सोडविलेला पेपर करयापरसुराई येथील चिंटू ऊर्फ बलदेव याच्या मोबाईलवर उत्तरासह पाठविण्यात आला. शिक्षकाबद्दलची कुठलीही माहिती मात्र यंत्रणांनी अद्याप दिलेली नाही.

उत्तरपत्रिकेची प्रिंट पिंटूने काढली आणि सकाळी 9 वाजता खेमनीचक येथील बंद लर्न अँड प्ले स्कूलच्या वसतिगृहात 20-25 उमेदवारांकडून प्रश्नोत्तरे पाठ करून घेण्यात आली. अर्थात या सर्व उमेदवारांना एकाच विषयात चांगली टक्केवारी मिळवता आली आहे. यावरून त्यांना एकाच विषयाचे प्रश्न आणि उत्तरे लक्षात ठेवता आली, असा निष्कर्ष काढला जात आहे.

मुन्नाभाई एमबीबीएस?

5 मे रोजी पोलिसांनी परीक्षा केंद्रातून अभिषेक या विद्यार्थ्याला अटक केली होती. त्याच दिवशी अभिषेकचे वडील अवधेश यांनाही अटक करण्यात आली होती.

अवधेश रांचीतील काको येथे राहतात. ते कोट्यधीश आहेत. नालंदा पोलिसांनी शुक्रवारी संजीव याच्या घरावर छापा टाकला होता; मात्र तो फरार झाला. संजीवच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली.

संजीव याचा मुलगा डॉ. शिव याने पीएमसीएचमधून एमबीबीएस केले आहे… संशयाच्या भोवर्‍यातील एक असलेले सिकंदर यादव यांच्या मुलीनेही एमबीबीएस केले असून, जावई पीजीला आहेत.

प्रभात रंजन यांच्या मुलीनेही एमबीबीएस केले आहे. प्रभात रंजन यांच्या खेमनीचक येथील घरातच 20-25 उमेदवारांना प्रश्नोत्तरे सांगण्यात आली होती. प्रभात रंजन आणि संजीवचे जवळचे संबंध आहेत. संजीवच्या सांगण्यावरूनच प्रभातने आशुतोषला घर भाड्याने दिले. प्रभात रंजनची पोलिसांनी चौकशीही केली होती. तोही संशयाच्या भोवर्‍यात आहे.

2024-06-23T02:15:45Z dg43tfdfdgfd