ZIKA VIRUS PUNE: पुण्यात वाढतोय 'झिका'चा संसर्ग; रुग्णसंख्येत वाढ, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : डेंगी, मलेरिया, चिकनगुनियापाठोपाठ आता शहरात ‘झिका’ विषाणूने डोके वर काढले असून, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एरंडवण्यातील २८ वर्षीय गर्भवती महिलेलाही ‘झिका’चा संसर्ग झाल्याने रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येऊनही या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून, मे महिन्यातील ‘अॅनोमली स्कॅन रिपोर्ट’ नॉर्मल असल्याची माहिची आरोग्य विभागाने दिली. शहरात आतापर्यंत ‘झिका’चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. पैकी तिघे एरंडवण्यातील असून, दोघे मुंढव्यातील आहेत.

‘गर्भवती महिलांनी घ्यावी खबरदारी’

‘डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांप्रमाणेच ‘झिका’चे रुग्ण पावसाळ्यात आढळतात. डेंगी आणि ‘झिका’चा संसर्ग एकाच डासापासून होतो. त्यामुळे या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच असतात. डेंगी, चिकनगुनिया आणि मलेरियासोबतच ‘झिका’चाही संसर्ग वाढण्याची शक्यता असते. ‘झिका’चे रुग्ण पूर्वी देशात आढळून येत नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात हे रुग्ण आढळत आहेत. सध्या आढळलेल्या रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे,’ असे संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी नमूद केले.

गर्भवती महिलांनी का काळजी घ्यावी?

‘झिका’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. तरीही गर्भवती महिलांना या विषाणूचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या बाळाला मेंदूविकार जडण्याची शक्यता असते. याशिवाय बाळाला जन्मजात दोष उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

‘काळजी घ्या; घाबरण्याची गरज नाही’

‘शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘झिका’चे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. ‘झिका’मुळे किडनी, यकृत किंवा अन्य अवयवांना धोका निर्माण झाल्याचे आतापर्यंत आढळून आलेले नाही. संसर्ग झालेल्या रुग्णांच्या प्लेटलेट कमी झाल्याचेही आढळून आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी,’ असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. संशयितांचे रक्त नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.- डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T07:28:50Z dg43tfdfdgfd