RAJ THACKERAY: लोकसभा निवडणुकीवर अमेरिकेतून पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे

Raj Thackeray : 'लोकसभेचा निकाल तर लागला आहे, त्यातून कोणी बोध घेतंय का हे पाहणं गरजेचं आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सर्व पक्षांना जमिनीवर आणून ठेवलं आहे,' अशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मतांशी जर प्रतारणा करणार असाल तर हे वायाच जाणारं प्रकरण आहे. हातामध्ये काही राहणारच नाही. हे घडत राहिलं तर आपण अराजकतेकडे जाऊ, असे रोखठोक मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे. भारतात खरी लोकशाही नाही, तर अमेरिकेत खरी लोकशाही आहे, असे राज ठाकरे यांनी अमेरिकेतील मुलाखतीत सांगितले आहे.

अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यक्रमात राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्याच शैलीत रोखठोक उत्तरे दिली आहे. तर लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र राजकारण, मराठी अस्मिता मुद्दा, मराठी भाषा अशा अनेक प्रश्नावर दिलखुलास प्रतिक्रिया दिली. तसेच निवडणूक आणि भारतीय व्यवस्थेसारख्या गंभीर प्रश्नावरही भाष्य केल्याचे दिसून आले आहे.

राज ठाकरे म्हणाले, भारतात खरी लोकशाही नाही, अमेरिकेत खरी लोकशाही आहे. उदाहरण देत ते म्हणाले, पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारी फॉर्मवर उमेदवाराची सही किंवा अंगठा असे लिहिले असते, यावरुन काय वाटणार? म्हणजे तो उमेदवार शिक्षित असला पाहिजे अशी अट नाही आहे. पण त्यांना मतदान करणारी माणसं ग्रॅज्युएट असली पाहिजेत, ही कोणती लोकशाही आहे. माणूस विचारांनी तरुण असला पाहिजे, भारतात लोकशाही असं म्हणतो पण भारतात लोकशाहीच नाहीये याचं कारण म्हणजे. माणूस सुशिक्षित असून चालत नाही तर सुज्ञ पण असावा लागतो, तिथेच लोकशाही नांदते. जगात सर्वात मोठी लोकशाही ते आपण लोकसंख्येच्या मानाने बोलतो. व्यवस्थेविरुद्ध मला राग आहे बाकी आपल्या देशाचा अभिमानच आहे.

दोन कानडी माणसं, दोन गुजराती माणसं एकत्र आले तर ते मातृभाषेत बोलतात, पण मराठी माणूस मात्र एकमेकांशी हिंदीत बोलायला लागतो. तु्म्ही जर समजा एखाद्याच्या घरी जेवायला गेलात, आमच्याकडे हा शब्द आपल्याला त्यापासून दूर लोटतो. मराठी म्हणून एकत्र उभे राहू, जाती पातीच्या भिंती पाडून एकत्र होऊ तर जग आपली दखल घेईल. अख्खा समाज जातपात मानत नसतो, ठराविक राजकारणी जातीचं राजकारण करतात. पण मला विश्वास आहे ती जातीपातीच्या भिंती गाडून महाराष्ट्र नक्की उभा राहणार, मी त्याला उभा करणार, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, १९९१ ला राजीव गांधी गेल्यानंतर जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हा गॅट आणि डंकेल मुळे जग सर्वांसाठी उघडं झालं होतं, यामध्ये चळवळी आणि राजकारणामधला शिक्षित मध्यमवर्ग जो होता. तो वर्ग १९९१ नंतर झपाट्याने बाहेर पडू लागला. जो श्रीमंत आणि गरीबांमधला दुवा होता, तो दुवाच बाहेर गेला आणि आता जो भारतात आहे ते राजकारणापासून दूर झालेत. त्यामुळे राजकारणात जे मातेलं झालेलं दिसतंय ते त्यातूनच आहे. अशाप्रकारच्या न मुरलेल्या लोकशाहीत जेव्हा तुम्ही प्रत्येकाला जेव्हा कोणकोणत्या न मार्गाने व्यक्त होण्याची मुभा देता त्यातून फक्त भांडणंच होऊ शकतात. ट्रोलिंग सध्या त्यातूनच सुरु आहे. नेत्यांनी ज्याप्रकारे लोकांना कंट्रोल केलं पाहिजे पण आता लोक नेत्यांना कंट्रोल करत आहेत, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T14:56:51Z dg43tfdfdgfd