पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पावसाची उघडझाप

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर परिसरात, धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत किंचित वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळीत गेल्या दोन दिवसात तीन फुटाने वाढ झाली असून राजाराम, रुई, इचलकरंजी हे बंधारे शनिवारी पाण्याखाली गेले.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात जोरदार पाऊस पडला होता. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड तालुक्याला पावसाने झोडपले होते. करवीर, शिरोळ, कागल, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यात उघडझाप सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

आणखी वाचा-अजित पवार गटाचे दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला; कोल्हापुरात खळबळ

गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अल्पप्रमाणात वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी आले आहे. बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोकादायक स्थितीतून वाहने नेऊ नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पेरण्याबाबत सावधगिरी

गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत इंचाइंचाने वाढ होत आहे. जिल्ह्यात अजूनही पेरण्या ५० टक्के इतक्याच झाल्या आहेत. पावसाचा नेमका अंदाज येत नसल्याने शेतकरी सावध भूमिका घेताना दिसत आहे.

2024-06-29T16:12:03Z dg43tfdfdgfd