कारी बदरी जवानी की छटती नहीं…

वयरोधक अर्थात ‘अ‍ॅन्टीएजिंग’ उत्पादनांची जगभरातली उलाढाल २०३० पर्यंत १२० अब्ज डॉलरवर जाण्याची अपेक्षा आहे. याची भारतातील बाजारपेठही १२ टक्के दरानं वाढेल, असा अंदाज आहे. ८० टक्के वयरोधक उत्पादनं स्त्रिया खरेदी करत असताना आणि ‘अॅन्टी एजिंग’चा सोस चाळिशीपन्नाशीच्या मागे सरकून विशीत आणि काही जणींच्या बाबतीत विशीच्याही आतच हवासा वाटू लागलेला असताना स्त्रीसौंदर्याची एकूण कल्पनाच पुन्हा तपासून पाहायची वेळ आलीय.

एलिझाबेथ बाथोरी ही हंगेरीमधल्या सरदार घरण्यातली स्त्री. पंधराव्या शतकातली ही स्त्री हंगेरीत ‘ब्लड वूमन’ म्हणुन कुप्रसिद्ध होती. तिनं आणि तिच्या चार नोकरांनी मिळून जवळजवळ ६५० तरुण मुलींचे खून केले, असं सांगतात. या गुन्ह्याबद्दल एलिझाबेथच्या नोकरांना फाशी देण्यात आली आणि तिला ठोठावण्यात आली आजन्म कारावासाची शिक्षा. का करत असे एलिझाबेथ हे खून? असं म्हणतात, की तिला चिरतारुण्य हवं होतं. तरुण मुलींचे खून करून त्यांच्या रक्तानं न्हायली, की असं तारुण्य प्राप्त होईल, असं तिला कुणी तरी तिला सांगितलं होतं. चिरतारुण्याची तिला इतकी कमालीची असोशी होती, की त्यासाठी शेकडो मुलींचे खून पाडायला तिनं मागेपुढे पाहिलं नाही… या कहाणीत तथ्य किती, हे सांगणारे कुठलेही पुरावे आता उपलब्ध नाहीत. मात्र आपण चिरतरुण दिसावं म्हणून माणसाची- विशेषत: स्त्रियांची चाललेली उरस्फोड आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांचा बाजार पाहिला की एलिझाबेथ बाथोरीची कहाणीसुद्धा खरी वाटू लागते!

हेही वाचा : स्त्री ‘वि’श्व: मासिक पाळीच्या रजेचे प्रश्न

ती साबणाची जाहिरात आठवतेय का?… तरुण पुरुषांना भुरळ पाडणारी त्यातली स्त्री ‘एका मुलीची आई असूनही’ कशी तरुण दिसते आहे, हे त्यात आपल्या मनावर ठसवलं जातं. निरनिराळ्या माध्यमांतून आदळणाऱ्या जाहिराती स्त्रियांवर अशा कुणा ‘परफेक्ट’ दिसणाऱ्या स्त्रीची स्वप्नवत छबी ठसवत राहतात. या जाहिरातींचा ‘साइड इफेक्ट’ असा होतो, की अशा असाध्य सौंदर्याच्या मृगजळामागे स्त्रिया आंधळेपणानं धावू लागतात. हे मृगजळ असतं, कधी कमनीय बांध्यांचं, कधी चमकदार केसांचं, कधी डागविरहित झळझळीत त्वचेचं, तर कधी वयावर मात करणाऱ्या सौंदर्याचं. या जाहिराती समाजमनावर परिणाम करतात यात वाद नाहीच. पण मुळात स्त्रीचं हे असं चित्रण करावं असं माध्यमांना सुचतं कुठून? समाजच ते त्यांना सुचवत नाही का?…

आणखी एक परिचित चित्र- लग्न लागतं, नवरी सोन्याच्या पावलांनी माप ओलांडून सासरी येते. लक्ष्मीपूजन थाटामाटात साजरं होतं. आग्रह झाल्यावर ती नवी नवरी कुण्या मावशी-काकूनं शिकवलेला उखाणा घेते- ‘सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य, सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य, अमुकतमुकचं नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या प्रीत्यर्थ’! बाईच्या दिसण्याचं केवढं उदात्तीकरण आपण केलं आहे, हे या साध्या उखाण्यावरूनसुद्धा लक्षात येतं. आपला समाज स्त्रीचं स्त्रीत्व तिच्या दिसण्याशी, सौंदर्याशी, कमनीय बांध्याशी जोडत आला आहे. त्यामुळे बाईला सतत चांगलं दिसत राहण्याचं, तरुण दिसत राहण्याचं अनामिक दडपण सोसावं लागतं. हा तिच्यावर टाकला गेलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बोजा आहे. ती अधिक हवीहवीशी वाटायला हवी असेल तर तिनं सुंदर दिसलं पाहिजे, हा एक अलिखित नियम होऊन बसला आहे. आणि सौंदर्य ही तर अशी गोष्ट आहे जी टिकत नाही. वय वाढतं, केस पिकतात, चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात, तसं बाईला आपण आपलं स्त्रीत्व हरवू लागलो आहोत अशी जाणीव होऊ लागते. आणि मग सुरू होते एक केविलवाणी धडपड… वयाशी, सरत्या काळाशी लावलेली एक दमवणारी शर्यत. तरुण दिसत राहण्यासाठीची उरस्फोड!

हेही वाचा : ‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!

सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या एका कंपनीनं तीस वर्षांहून जास्त वय असलेल्या २ हजार स्त्रियांचं एक सर्वेक्षण केलं. त्यातल्या ६६ टक्के स्त्रियांना वय वाढल्यामुळे आपण पुरुषांना आकर्षक वाटत नाही असं वाटत होतं. २५ टक्के स्त्रियांनी वय वाढल्यानं आपण वाईट दिसतो आहोत असं वाटून कित्येक कार्यक्रमांची आमंत्रणं नाकारली होती. चांगलं आणि तरुण दिसत राहण्याचं दडपण बाईवर किती आहे, हे सांगणारं हे सर्वेक्षण पुरेसं बोलकं आहे.

चाळिशीत पदार्पण करणाऱ्या स्त्रियांच्या डोक्यात एक अफाट गोंधळ उडालेला असतो. एकीकडे या वयातच अनेक जणींना त्यांचं स्वत्त्व सापडू लागलेलं असतं. मुलाबाळांच्या, संसाराच्या जबाबदाऱ्यांतून सुटवंग होत त्या स्वत:साठी वेळ काढू लागलेल्या असतात. आपल्या कामात अधिक झोकून देऊ शकत असतात. उत्तम आत्मविश्वास त्यांनी कमावलेला असतो, शहाणपण आलेलं असतं. तर दुसरीकडे वय वाढल्यानं आपण सुंदर दिसत नाही, आपलं स्त्रीत्व ओसरू लागल्यामुळे आपण काही कामाचे उरलेलो नाही, असंही त्यातल्या अनेकींना वाटू लागतं. एकीकडे अत्यंत आश्वस्त वाटत असतानाच दुसरीकडे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, केसातली रुपेरी छटा तिला भिववत असते. आपल्यातल्या तरुण स्त्रीशी तिनं आपलं अस्तित्व बांधून घातलेलं असतं. आरशात दिसणाऱ्या आपल्या पोक्त प्रतिबिंबाचा मनातल्या अस्तित्वाशी मेळ बसत नाही. मग सुरू होतो तरुण दिसण्याच्या मृगजळाचा पाठलाग. स्त्रीच्या मनातली ही असुरक्षितता मग बाजारपेठेनं हेरली नसती तरच नवल. केस काळे करणाऱ्या, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि डोळ्यांखालचे ‘कावळ्याचे पाय’ कमी करणाऱ्या प्रसाधनांच्या जाहिरातींचा मारा स्त्रीवर सुरू होतो. ती तिच्याही नकळत याला बळी पडते. अगदी विशीमधली तरुणी जरी सौंदर्यप्रसाधनं खरेदी करायला गेली, तरी ‘वय वाढण्याच्या खुणा वेळीच थोपवण्यासाठी ही-ही प्रसाधनं वापरणं सुरू करा,’ असा अनाहूत सल्ला तिला दिला जातो. काहीही कळत नसताना पहिलं ‘अॅन्टी-एजिंग क्रीम’ ती विशीतच खरेदी करते आणि हा प्रवास सुरू होतो.

आपलं वय वाढतं म्हणजे नक्की होतं तरी काय? आपल्या गुणसूत्रांच्या टोकापाशी ‘डीएनए’ची एक संरक्षक टोपी असते. तिला म्हणतात ‘टेलोमिअर्स’. बुटांच्या लेसच्या टोकावर जसं प्लास्टिकचं छोटं आवरण असतं, तसं टेलोमिअर हे गुणसूत्रांच्या टोकावर घातलेलं संरक्षक आवरण आहे. आपल्या शरीरातल्या पेशी जेवढ्या वेळा विभाजित होतात, त्या दर वेळी पेशींमधल्या गुणसूत्रांची लांबी थोडी कमी होत असते. टेलोमिअर स्वत:ची लांबी कमी होऊ देतं आणि गुणसूत्राचं संरक्षण करतं. जसजसं व्यक्तीचं वय वाढू लागतं, तसतशी टेलोमिअरची लांबी कमी कमी होऊ लागते. टेलोमिअर्स एका मर्यादेपलीकडे लहान झाले, तर पेशींचं विभाजन होऊ शकत नाही आणि शरीराचा प्रवास वार्धक्याकडे होऊ लागतो. या वार्धक्याचा शरीरातल्या प्रत्येक भागावर, प्रत्येक अवयवावर परिणाम होणारच असतो. मग ते अंतर्गत अवयव असोत किंवा त्वचा, केस यांसारखे दृष्टीला पडणारे भाग. मनाला खुपू लागतात ते बाह्यरूपातले बदल. त्वचेमधलं ‘कोलॅजिन’ आणि ‘इलॅस्टिन’ जसजसं कमी होऊ लागतं, तशी त्वचेची तन्यता कमी होऊ लागते आणि त्यामुळे सुरकुत्या पडायला लागतात. त्वचेवरील तुकतुकी कमी होऊ लागते. त्वचा निस्तेज दिसू लागते. डोळ्यांखालची त्वचा ओघळून पिशवीसारखी दिसायला लागते. हे परिणाम डोळ्यांना लगेच दिसतात आणि अस्वस्थ करू लागतात. तेही विशेषत: स्त्रियांना! वेड्यापिश्या झालेल्या ययातीसारखा तारुण्याचा शोध सुरू होतो. मग एखादी स्त्री वेदनादायक सौंदर्य शस्त्रक्रिया स्वत:वर करून घेऊ लागते, भल्यामोठ्या ‘स्किन केअर रुटीन’मध्ये वेळ घालवू लागते. वय तरुण भासेल या आशेनं तशा तऱ्हेच्या कपड्यांत आपलं बदलू लागलेलं शरीर अक्षरश: कोंबू लागते. पोक्त दिसू नये म्हणू स्त्रिया काय काय म्हणून करत नाहीत?… फार भुवया उंचावल्या तर कपाळावरच्या सुरकुत्या दिसतील, फार डोळे बारीक केले तर डोळ्यांच्या बाजूला कावळ्याच्या पायांसारख्या रेघा दिसतील आणि फार हसलं, तर ओठांच्या बाजूला ‘स्माइल लाइन्स’ दिसतील, अशा भीतीनं स्वत:ला पुरेसं अभिव्यक्त न करणाऱ्या किती तरी बायका आहेत. याशिवाय निरनिराळी वयरोधक उत्पादनं आणि उपचार यांचा बाजारात जणू महापूर आला आहे आणि स्त्रिया या महापुरात जणू वाहावत गेल्या आहेत.

हेही वाचा : स्त्रियांचे न्याय्य प्रतिनिधित्व हवे

हे उपचार दोन प्रकारचे आहेत- अंतर्गत उपचार आणि बाह्य उपचार. अंतर्गत उपचारांत समावेश आहे पोटातून घेण्याच्या औषधांचा आणि इंजेक्शन्सचा. यात ग्रोथ हॉर्मोन्स, एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, मेलॅटोनिन, अॅन्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, रेझर्व्हेटरॉल, स्टेरॉइड्स यांचा समावेश आहे. ही उत्पादनं काही प्रमाणात वार्धक्याच्या खुणा पुढे ढकलू शकतात, पण जोवर टेलोमिअर्सचं लहान होणं थांबवता येत नाही, तोवर ही उत्पादनं फार काही करू शकणार नाहीत.

बाह्य उपचार दोन प्रकारचे आहेत. चेहऱ्यावर लावण्याची उत्पादनं आणि चेहऱ्यावर देण्याची इंजेक्शन्स. भारतात या वयरोधक उत्पादनांची बाजारपेठ तुफान वेगानं वाढते आहे. २०२१ मध्ये या उत्पादनांची जगभरात झालेली उलाढाल ६० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती आणि २०३० साली ती दुप्पट होणार आहे. यात एशिया पॅसिफिक विभागाचा वाटा आहे ८.०९ अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि पुढच्या दहा वर्षांत हा व्यापार ५.६९ टक्के इतक्या दरानं वाढणार आहे. भारताचा यातला वाटा किती? तर इतर एशिया पॅसिफिकच्या तुलनेत दुप्पट वेगानं- म्हणजे १२ टक्के दरानं भारताची ही बाजारपेठ विस्तारणार आहे (‘मार्केट डेटा फोरकास्ट’ या संस्थेच्या अनुमानानुसार.). वयरोधक उत्पादनांची जी उलाढाल होते आहे, त्यातील ८० टक्के उत्पादनं स्त्रिया खरेदी करतात. ती वापरणाऱ्या पुरुषांचं प्रमाण केवळ २० टक्के आहे. ही उत्पादनं आहेत तरी कोणती? यात त्वचेवर लावण्याची निरनिराळी उत्पादनं आहेतच, पण त्याचबरोबर केसांना लावण्याची उत्पादनं आणि इतर सौंदर्यप्रसाधनंदेखील आहेत. अॅन्टी एजिंग फेस क्लिन्झर्स, अॅन्टी एजिंग सिरम्स, क्रीम्स यांचा यात प्रामुख्यानं समावेश आहे. रेटिनॉल, ‘एएचए’, ‘बीएचए’, हायल्युरॉनिक अॅसिड, व्हिटामिन सी, नियासिनामाइड, पेप्टाइड्स, सिरामाइड्स, हे या उत्पादनांतले प्रमुख घटक आहेत.

या प्रसाधनांशिवाय आता प्रसिद्ध होऊ लागले आहेत, ते चेहऱ्यावर करण्याचे काही उपचार. हे उपचार दोन प्रकारचे आहेत- इंजेक्शन देऊन करण्याचे आणि इंजेक्शन न देता करण्याचे. या ‘इंजेक्टेबल’मध्ये प्रामुख्यानं समावेश आहे तो ‘बोट्युलिनम टॉक्सिन’- ज्याला सामान्यत: ‘बोटॉक्स’ म्हणून ओळखलं जातं त्याचा. ‘क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनियम’ नावाच्या जिवाणूत तयार होणारं हे ‘न्युरोटॉक्सिन’ जगातल्या अत्यंत विषारी पदार्थांपैकी एक आहे. त्याला ‘मॅजिक पॉयझन’ असंही म्हणतात. औषध म्हणून बोटॉक्सचे अनेक उपयोग आहेत, पण वयरोधक उपचारांत त्याचा उपयोग कपाळ आणि गळ्यावरच्या आठ्यांच्या जागी पडणाऱ्या रेषा किंवा डोळ्यांच्या आणि ओठांच्या बाजूच्या हास्यरेषांच्या जागी दिसणाऱ्या सुरकुत्या घालवण्यासाठी केला जातो. बोटॉक्सची इंजेक्शन्स चेहऱ्यावर दिली, की ८ ते १० दिवसांत चेहरा तरुण आणि त्वचा घट्ट दिसू लागते आणि हा परिणाम चांगला सहा-सात महिने टिकतो. याशिवाय दुसरा एक उपाय म्हणजे ‘डर्मल फिलर्स’ची इंजेक्शन्स. हे फिलर्स म्हणजे हायल्युरोनिक अॅसिड किंवा पॉली एल लॅक्टिक अॅसिडसारखे पदार्थ असतात. त्यांच्या इंजेक्शनमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होऊन त्वचा रसरशीत दिसू लागते. बोटॉक्स किंवा डर्मल फिलर्ससारखे पूर्वी केवळ तारेतारका वापरत असलेले उपचार आता हळूहळू सामान्य स्त्रियांच्यादेखील आवाक्यात येऊ लागले आहेत.

हेही वाचा : एकमेकींच्या आधाराचा पूल

परंतु वयरोधक प्रसाधनांची ही त्सुनामी आपल्याला कुठे घेऊन जातेय हे जरा थबकून पाहायला हवं! कारण धोक्याचे इशारे दिसू लागले आहेत. अवघ्या दहा ते अठरा वर्षांच्या मुलींतसुद्धा ‘वय वाढायला लागल्यामुळे आपली त्वचा वाईट दिसत आहे’ अशी चिंता वाढीला लागत असल्याचं काही निरीक्षणांत समोर आलंय. मजेत हसण्याबागडण्याच्या वयात मुली ‘अॅन्टी एजिंग स्किन केअर रूटीन’च्या मागे लागल्या आहेत. जगप्रसिद्ध मॉडेल किम कार्डाशियनच्या दहा वर्षांच्या मुलीनं- नॉर्थ वेस्टनं दोन वर्षांपूर्वी (८ वर्षांची असताना!) सोशल मीडियावर शेअर केलेलं स्किन केअर रूटीनचं रील कसं गाजलं होतं, ते अनेकांना आठवत असेल. एका अतिप्रसिद्ध फ्रेंच कंपनीची ‘बेबी स्किन केअर रूटीन’ची नवी उत्पादनं बाजारात आली आहेत. भविष्यात चेहऱ्यावर ‘स्माइल लाइन्स’ दिसू नयेत म्हणून खिदळण्याच्या वयातल्या मुली माफक हसू लागल्या आहेत! हे अशा प्रकारचं ‘वयातीत’ सौंदर्य आपल्याला खरोखर हवं आहे का?…

स्त्रीनं ‘आहे त्या वयाचं’ दिसणं मान्यच नाही?

‘मिस युनिव्हर्स’ ही सौंदर्यस्पर्धा घेणाऱ्या संघटनेनं आपले नियम शिथिल करून १८ वर्षांवरील कुणीही स्त्री ‘मिस युनिव्हर्स’ होऊ शकेल, असं गतवर्षी जाहीर केलं. या स्पर्धांबाबतची बाजारपेठेची गणितं हा एक स्वतंत्र विषय आहे, परंतु काही दिवसांपूर्वी ६० वर्षांच्या अलेजांड्रा रॉड्रिगेझनं ‘मिस युनिव्हर्स ब्युनॉस आयरिस’ ही सौंदर्यस्पर्धा जिंकली, तर मागच्या आठवड्यात ७१ वर्षांच्या मरिसा तेयो हिनं ‘मिस टेक्सास यूएसए’मध्ये भाग घेऊन बातम्यांत स्थान मिळवलं. या स्त्रियांचा उत्साह प्रशंसनीयच. पण त्यांच्या बाबतीत व्यक्त झालेल्या बहुतेक प्रतिक्रिया या ‘या अजिबातच म्हाताऱ्या दिसत नाहीत!’ अशाच होत्या. चाळिशीपन्नाशीला आलेल्या किंवा त्यापुढच्या चित्रपट अभिनेत्रींना आजही समाजमाध्यमांवर ‘म्हाताऱ्या’ म्हणून जे ‘ट्रोलिंग’ होतं, त्यावरूनही स्त्रीनं तिच्या वयाचं दिसणं समाजाला मान्य नाहीये, हेच अधोरेखित होतं!

(लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)

[email protected]

2024-06-28T20:54:11Z dg43tfdfdgfd