CONGRESS: अदानीवरून काँग्रेसकडून मोदी लक्ष्य; ऊर्जा प्रकल्पासाठी चीनच्या मदतीचा आरोप

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा अदानी ग्रुपवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. अदानी समूहाने त्यांच्या सौरउत्पादन प्रकल्पाला मदत करण्यासाठी आठ चिनी कंपन्यांची निवड केल्याच्या वृत्ताचा हवाला देत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी चीनवरील भारताचे अवलंबित्व सोडवण्यासाठी धोरण आखण्याची मागणी केली. तसेच, करदात्यांच्या पैशांचा चिनी कंपन्यांना फायदा होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.

‘गलवान चकमकीनंतर १९ जून २०२० रोजी बिगर-जैविक पंतप्रधानांनी देशाला सांगितले होते की, आपल्या सीमेत कोणीही घुसलेले नाही आणि कोणीही प्रदेश ताब्यात घेतलेला नाही. परंतु आपल्या ‘टेम्पोवाला’ मित्रांपैकी एकाला मदत करण्यासाठी चिनी कामगारांना उदारपणे व्हिसा देण्यास पंतप्रधान अजिबात संकोच करत नाहीत,’असे जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे. ही पोस्ट करताना त्यांनी अदानी सोलर कंपनीने चीनमधून काही इंजिनीअर बोलवण्यासाठी केंद्राची परवानगी मागितली असल्याचे वृत्त जोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान राहुल गांधी यांनी अदानी व अंबानी यांना शिविगाळ करणे का थांबवले? त्यांच्याकडून टेम्पो भरून पैसे आले का, अशा शब्दांत हल्ला केला होता. त्याचा उल्लेख करत रमेश यांनी ‘टेम्पोवाला मित्र’ असा उपहासात्मक उल्लेख केला.

‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेद्वारे करदात्यांची मोठी रक्कम मिळवणाऱ्या अदानी समूहाने त्याच्या सौर उत्पादन प्रकल्पाला मदत करण्यासाठी आठ चिनी कंपन्यांची निवड केली असून ३० चिनी कामगारांना व्हिसा देण्यासाठी विशेष परवानगी मागितली आहे,’ असे रमेश यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे. आपल्या जोडीदाराचा आणि जवळच्या मित्राचा फायदा व्हावा यासाठी पंतप्रधानांनी या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केला नाही का?, असा प्रश्नही जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे. ‘पूर्व लडाखमधील दोन हजार चौरस किलोमीटरचा भारतीय भूभाग चिनी लोकांनी व्यापलेला असतानाही या सवलती दिल्या जात आहेत, हे खूपच वाईट आहे,’ अशीही टीका त्यांनी केली. चीनमधून भारताची आयात २०१८-१९मधील ७० अब्ज डॉलरवरून २०२३-२४मध्ये १०१ अब्ज डॉलरवर पोहोचली असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘चीनवरील अवलंबित्वातून भारताला बाहेर काढण्यासाठी आणि करदात्यांच्या निधीतून चिनी कंपन्यांना फायदा होणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी योग्य रणनीती आखण्याची हीच वेळ आहे,’ असेही ते म्हणाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T14:26:21Z dg43tfdfdgfd