MU AUTONOMOUS COLLEGES LIST: मुंबई विद्यापीठाच्या आणखी ६ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा

Mumbai University News : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या आणखी ६ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने ६ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. ही संख्या आता १८ वर गेली असून यापूर्वी १२ स्वायत्त महाविद्यालयांना हा दर्जा देण्यात आला होता. राज्यात सर्वाधिक अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालये ही मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहेत. अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित/सह (Joint Degree) पदवी प्रदान करता येईल. या पदवी प्रमाण पत्रावर विद्यापीठ आणि अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचे नाव आणि लोगो असणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने अशी महाविद्यालये भविष्यात पदवी बहाल करण्यासाठी मार्गक्रमण करणार आहेत. अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना नवीन प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या मंजूरीने पीएचडीचे अभ्यासक्रम सुरु करणे, अभ्यासक्रमांची शुल्क रचना करणे अशा अनुषंगिक बाबींसाठी अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना स्वातंत्र्य मिळणार आहे. अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांत सुरु असलेल्या अभ्यासक्रमांची पूनर्रचना करणे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नामाभिधानाप्रमाणे अभ्यासक्रमांची नावे बदलणे, मूल्यांकनाची पद्धत विहित करणे, निकाल जाहीर करणे, गुणपत्रक बहाल करणे याचीही मूभा अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना मिळणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२३ मध्ये नमूद अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या तरतूदीच्या अनुषंगाने स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यासंदर्भात मानके व कार्यपद्धती निश्चित करून महाराष्ट्र शासनातर्फे एकरूप परिनियम २२ मे, २०२३ च्या अधिसूचनेनुसार निर्गमित करण्यात आले. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने १५ मे २०२४ रोजी परिपत्रक काढून स्वायत्त महाविद्यालयांकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या दर्जासाठी अर्ज मागविले होते. विद्यापीठास प्राप्त झालेल्या एकूण ७ अर्जांची रितसर दुबार छाननी करून एकूण ६ स्वायत्त महाविद्यालयांचे अर्ज अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयासाठी पात्र करण्यात आले. सर्व पात्र अर्ज विद्या परिषदेच्या शिफारशीने व्यवस्थापन परिषदेने मान्य केले आहेत. यामध्ये या स्वायत्त महाविद्यालयांचा समावेश आहे-

१) डी. जे. सांघवी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, विलेपार्ले (Dwarkadas J. Sanghvi College of Engineering)

२) आर.ए. पोदार महाविद्यालय, माटुंगा (R.A.Podar College Of Commerce & Economics)

३) ठाकुर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, कांदिवली (Thakur College of Science and Commerce)

४) मॉडेल कॉलेज, डोंबिवली (Model College)

५) एन.एम.कॉमर्स अँड इकोनॉमिक्स कॉलेज, विलेपार्ले (Narsee Monjee College of Commerce and Economics)

६) कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन, मरिन लाईन्स (College of Social Work, Nirmala Niketan)

मुंबई विद्यापीठाने टाकलेले हे महत्वाचे पाऊल:

“विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार उत्कृष्टताक्षम आणि उच्चस्तरीय दर्जा प्राप्त केलेल्या विद्यापीठाशी सलंग्नित ६ स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पुढील दहा वर्षासाठी अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात येत आहे. यापूर्वी १२ स्वायत्त महाविद्यालयांना हा दर्जा बहाल केला गेला असून ही संख्या आता १८ वर आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने अशी महाविद्यालये भविष्यात पदवी बहाल करण्यासाठी मार्गक्रमण करणार आहेत. राज्यात सर्वाधिक १८ अधिकारप्रदत्त महाविद्यालये आणि ८० स्वायत्त महाविद्यालये ही मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असून शैक्षणिक स्वायत्तेकडे मुंबई विद्यापीठाने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.”

-प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

स्वागताहर्य बाब:

“अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाच्या दर्जासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांनी सर्वाधिक केलेले अर्ज ही स्वागताहर्य बाब आहे, यामुळे शैक्षणिक क्षेत्रात या महाविद्यालयांचा प्रागतिक दृष्टिकोन दिसून येतो. ”

-प्रा. डॉ. अजय भामरे, प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T14:49:36Z dg43tfdfdgfd