प्रचार तोफा आज थंडावणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी (दि. 5) थंडावणार आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस रविवार सुट्टीचा दिवस आल्यामुळे हा प्रचाराचा सुपरसंडे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात येणार आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज व महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्यात थेट लढत आहे. ही लढत महाविकास आणि महायुतीने प्रतिष्ठेची बनवली आहे; तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील-सरूडकर, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी व वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डी. सी. पाटील निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे हातकणंगलेत चौरंगी लढत आहे.

महिनाभरापासून जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. प्रचार फेर्‍या, सभा, कोपरा सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका, रिक्षावरून करण्यात येत असलेला प्रचारामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे.

गावातील चौकाचौकांत उमेदवारांचे फलक लावण्यात आले आहेत. पक्षाचे झेंडे, पताका, यामुळे चौक रंगीबेरंगी झाले आहेत. राष्ट्रीय व राज्यपातळीवरील नेत्यांचे प्रचारासाठी दौरे झाले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापासून पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वजण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दौर्‍यावर आले होते. दिवसभरात रोज पाच ते सहा कोपरा सभांचे आयोजन करण्यात येत होते.

यावेळी कमालीची चुरस निर्माण झाल्यामुळे दोन्हीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तर टीकेची पातळी घसरली. वैयक्तिक पातळीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सिनेअभिनेते गोविंदा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभा घेतल्या आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा झाल्या.

गावागावांत पदयात्रा

प्रचाराचा शेवटचा दिवस रविवारी सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे कार्यकर्त्यांना गावागावांत पदयात्रांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात येणार आहे; तर महाविकास आघाडीच्या वतीने घरोघरी संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

2024-05-05T02:34:17Z dg43tfdfdgfd