YOGI ADITYANATH: योगींच्या सभेने वातावरण बदलणार? डॉ. भामरेंच्या प्रचारार्थ आज मालेगावी दौरा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव : धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज (दि. १८) मालेगावात जाहीर सभा होत आहे. सकाळी १० वाजता कॉलेज ग्राउंड येथे ही सभा होत आहे. प्रचारतोफा आज थंडावणार असल्याने योगींची प्रचारतोफ मालेगावात धडाडणार असल्याने योगी काय बोलतात याविषयी उत्सुकता आहे.

योगी आदित्यनाथ यांच्यासमेवत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, दिलीप बोरसे उपस्थित राहणार आहेत. मालेगावात भाजपचे डॉ. भामरे व काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चुरशीची लढत होत आहे. लोकसभेच्या प्रचारादरम्यान अद्याप मालेगाव शहरात एकाही बड्या भाजप नेत्याची सभा झालेली नाही. आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होत असल्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जाते. प्रचारातही हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने लावून धरला असून, या पार्श्वभूमीवर मुस्लिमबहुल मालेगाव शहरात योगी आदित्यनाथ यांची सभा होत असल्याने त्यास वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी दिवसभर या सभेची कॉलेज ग्राउंडवर जय्यत तयारी सुरू होती. पावसाची शक्यता लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, पोलिस उपनिरीक्षक तेजबिरसिंग संधू, निरीक्षक ज्योती गडकरी सकाळपासूनच सभास्थळी सुरक्षा व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेत होत्या. भाजप पदाधिकाऱ्यांनीही सभास्थळी बैठक घेऊन तेथे तळ ठोकून होते. या सभेला लाखभर लोकांची गर्दी अपेक्षित आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-18T01:24:46Z dg43tfdfdgfd