MURDER CASE : अखेर महाळुंगे खुनातील 'तो' मुख्यआरोपी गजाआड

चाकण : पुढारी वृत्तसेवा : महाळुंगे (ता. खेड) येथून अपहरण करुन तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. खून झालेल्या तरुणाचा मृतदेह गुजरातमधील वापी येथे नेऊन जाळल्याचे तपासात उघड झाले आहे. राहुल संजय पवार (वय 34, रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर 2013 पासून त्याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. तो नाव, पेहराव बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, अखेर औंध येथे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

राहुल पवार याचा भाऊ रितेशचा महाळुंगे येथे सहा जणांनी खून केला. याप्रकरणी म्हाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे. या खून प्रकरणातील एका आरोपीचा मित्र आदित्य युवराज भांगरे (वय 18) याने रितेशच्या खुनासंदर्भातील वादग्रस्त पोस्ट लाईक, शेअर केल्याने राहुल आणि त्याच्या साथीदारांनी 16 मार्च 2024 ला आदित्यचे अपहरण केले. त्यानंतर, त्याता खून करमन मृतदेह गुजरातमधील वापी येथे नेऊन जाळला. त्यानंतर राहुल पसार झाला.

स्वतःची ओळख लपविण्यासाठी तो मोबाईलचा वापर टाळायचा. डोक्यावरील केस, दाढी आणि मिशा काढल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. पोलिसांनी त्याच्या संपर्कातील 67 लोकांकडे चौकशी केली. तसेच तो वावरत असलेल्या कासारवाडी भागातील दुकाने, चौक व मेट्रो स्टेशनचे एकूण 124 सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजची तपासणी करण्यात आली. याच काळात राहुल हा औंध परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याने पेहराव, ओळख बदलली होती. त्यामुळे, तो सागर संजय मोरे (रा. आळंदी) असे स्वतःचे खोटे नाव सांगत होता. मात्र, त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो राहुल पवार असल्याचे निष्पन्न झाले. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा

2024-04-26T08:44:44Z dg43tfdfdgfd