मागील पानावरून पुढे

सत्ताधारी आणि विरोधकांनीही आपला हेका न सोडल्यामुळे लोकसभेच्या सभापतिपदाची निवडणूक पार पडली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली. सर्वांच्याच भाषणांमधून ‘सहमती’, ‘विधायक विरोध’ आदी शब्दांची मुक्त पखरण असली, तरी प्रत्यक्षात मात्र शुद्ध राजकारणच पुन्हा एकदा जिंकले. मात्र, या निवडणुकीचा घटनाक्रम आणि झालेले आरोप-प्रत्यारोप पाहता निवडणुकीतील जनादेश काहीही असला, तरी कामकाज पूर्वीप्रमाणेच चालणार आणि मतभेदाच्या ठिणग्या उडतच राहणार, असे दिसते.

लोकसभेच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी, हा सत्ताधाऱ्यांचा आग्रह होता; तर उपाध्यक्षांचे पद संकेतांप्रमाणे विरोधकांना मिळावे, असा विरोधकांचा दावा. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी नेत्यांशी चर्चा केली. मात्र, उपाध्यक्षपदाचा शब्द ते देऊ शकले नाहीत. खरे तर गेल्या लोकसभेत सत्ताधाऱ्यांनी मुळात उपाध्यक्षपदावर नियुक्तीच केली नव्हती, तेथे आता हे पद मिळेल, अशी अपेक्षा विरोधी पक्षांनाही नसणार. मात्र, त्यांना आपला वाढलेला आवाज दाखवून द्यायचा होता, तर सत्ताधाऱ्यांची झुकण्याची तयारी नव्हती. त्यामुळेच अखेर बिर्ला आणि के. सुरेश यांच्यात आवाजी मतदानाने निवडणूक झाली. सत्ताधारी आघाडीकडे बहुमत असल्यामुळे बिर्ला यांचा विजय निश्चित होता. विरोधकांनीही मतविभागणी न मागता संख्याबळाची झाकली मूठ कायम ठेवली. उमेदवार निश्चित करताना विश्वासात न घेतल्याबाबत तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्याने ‘इंडिया’ आघाडीतील कुरबुरीही समोर आल्या.

बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, गेल्या पाच वर्षांतील सभागृह चालविण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांच्या कार्यकाळात ३७०वे कलम हटविणे, ‘तिहेरी तलाक’ला सोडचिठ्ठी, महिला आरक्षण विधेयक असे अनेक महत्त्वपूर्ण कायदे अस्तित्वात आले, तर कृषी कायद्यासारख्या विषयांवर सरकारला माघारही घ्यावी लागली. आता विरोधकांचे संख्याबळ वाढले असून लोकसभेला विरोधी पक्षनेतेही मिळाले आहेत. त्यामुळे विरोधकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशारा त्यांच्या स्वागतातच अनेक सदस्यांनी दिला. त्याप्रमाणेच गेल्या सभागृहाप्रमाणे दीडशे खासदारांच्या घाऊक निलंबनाची पुनरावृत्ती होऊ नये, अशीही अपेक्षा व्यक्त झाली. एकूणात सहमतीचा कितीही आव आणला, तरी विरोधकांना सत्ताधाऱ्यांबद्दल आदराचा अभाव आणि सत्ताधाऱ्यांचा तोरा कायम, अशीच स्थिती दिसली. त्यामुळेच नव्या लोकसभेची सुरुवातच मतभेदांनी झाली. पुढे तरी परस्पर सामंजस्याने कामकाज होते का, हे पाहायचे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-27T06:27:11Z dg43tfdfdgfd