HATHRAS STAMPEDE: चेंगराचेंगरी कशी टाळता येऊ शकते?

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील एका सत्संग कार्यक्रमादरम्यान मंगळवारी (२ जुलै) झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११६ जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो भाविक जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण सर्वाधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारच्या धार्मिक आयोजनामध्ये चेंगराचेंगरी होऊन मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. एफ. टी. इलियास आणि इतरांनी जमविलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, १९५४ ते २०१२ या काळात भारतात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांमधील ७९ टक्के घटना या धार्मिक कार्यक्रमांमध्येच घडल्या आहेत. (ह्युमन स्टॅम्पेड्स ड्युरिंग रिलिजियस फेस्टिव्हल्स : अ कम्पॅरेटिव्ह रिव्ह्यू ऑफ मास गॅदरिंग इमर्जन्सीज इन इंडिया, २०१३) चेंगराचेंगरीच्या घटना कशा घडतात आणि त्यामागे कोणती कारणे असतात, ते पाहू.

हेही वाचा : सुनिता विल्यम्स यांच्यासह अंतराळ स्थानकात गेलेले नासाचे अंतराळवीर का परतले नाहीत? त्यांच्यासमोर काय अडचणी आहेत?

चेंगराचेंगरी म्हणजे काय?

वेंगुओ वेंग आणि इतरांनी केलेल्या चेंगराचेंगरीच्या व्याख्येनुसार, “गर्दी अथवा जमावाने आवेगाने अथवा शिताफीने केलेली अशी हालचाल की, ज्यामुळे बरेचदा अनेकांना दुखापत आणि मृत्यू होण्याची शक्यता असते.” (रिव्ह्यू ऑफ अनॅलिसीस ऑन क्राऊड-गॅदरिंग रिस्क अॅण्ड इट्स इव्हॉल्युशन मेथड्स, २०२३) इलियास आणि इतरांनी केलेल्या व्याख्येनुसार, जेव्हा गर्दी अथवा लोकांचा जमाव सुव्यवस्थित मार्गाने जाणे थांबवतो तेव्हा चेंगराचेंगरी होते. त्यामुळे बरेचदा अनेकांना दुखापत होते; तर काहींचा मृत्यूही होतो. काहीतरी धोका आहे अथवा पुरेशी जागा नाही, असे जेव्हा गर्दीतील लोकांना वाटू लागते तेव्हा अशी घटना घडते. तसेच जेव्हा लोकांना काहीतरी तातडीने हवे असते आणि त्यासाठी गर्दीतील लोक शिताफीने हालचाल करू लागतात, तेव्हा अशा चेंगराचेंगरीच्या घटना घडतात.

चेंगराचेंगरीमुळे मृत्यू का होतात?

चेंगराचेंगरीमध्ये होणाऱ्या बऱ्याचशा मृत्यूंना ”ट्रॉमॅटिक एस्फिक्सिया’ कारणीभूत ठरतो. ‘ट्रॉमॅटिक एस्फिक्सिया’ म्हणजे अशी स्थिती की, ज्यामध्ये व्यक्तीच्या छाती आणि पोटाच्या वरच्या भागावर इतका दाब पडतो की, त्याचा श्वास रोखला जातो आणि त्यातून मृत्यू होण्याची शक्यता उदभवते. अपुऱ्या जागेमध्ये अगदी लहान जमावदेखील एकाच दिशेने ढकलला गेल्यास, त्यातील लोक गंभीरपणे जखमी होऊ शकतात. या चेंगराचेंगरीमध्ये अगदी ट्रॉमॅटिक एस्फिक्सिया होऊन लोक मारलेही जाऊ शकतात. चेंगराचेंगरीत होणाऱ्या मृत्यूला आणखीही काही गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. हृदयविकाराचा झटका येणे हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. चेंगराचेंगरीमध्ये हृदयाच्या एका भागामध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे किंवा तो पूर्णपणे बंद झाल्यामुळे असा झटका येऊ शकतो. बऱ्याचदा चेंगराचेंगरीमध्ये शरीरांतर्गत असलेल्या अवयवांवर दबाव पडल्याने त्यांना दुखापतही होऊ शकते. त्यामध्ये डोक्याला जबर दुखापत होणे अथवा गळा दाबला जाणे अशा गोष्टींचा समावेश होतो. या गोष्टी घडल्या, तर गंभीर दुखापत होणे अथवा थेट मृत्यू होणे शक्य असते.

चेंगराचेंगरीमध्ये मानसिकता कशी काम करते?

सामूहिक मेळावे, जमाव अथवा गर्दीच्या ठिकाणीच चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. आता घडलेल्या हाथरसच्या घटनेतील जमाव हा पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये जमलेला होता. मात्र, चेंगराचेंगरी होणाऱ्या ठिकाणची गर्दी नेहमी ठरवूनच जमलेली असेल, असे नाही. बऱ्याचदा मेट्रो अथवा रेल्वेस्थानकावर उत्स्फूर्तपणे जमलेल्या गर्दीतही चेंगराचेंगरी होऊ शकते. जमलेल्या गर्दीमध्ये घबराट अथवा भीती पसरल्यामुळे चेंगराचेंगरी सुरू होते किंवा ती अधिक भीषण होऊ लागते. मानसशास्त्रज्ञ अलेक्झांडर मिंट्झ यांनी असे म्हटले आहे की, ज्या परिस्थितीत भीती निर्माण होते, तिथे सहकार्याची भावना अपेक्षित असते. सर्वांनी एकमेकांना सहकार्य केले, तर भीती कमी होते. मात्र, जेव्हा सहकार्य करण्याची मानसिकता कमी होऊन, भीती वरचढ ठरते तेव्हा परिस्थिती अधिकच बिकट होते. (नॉन-अडॅप्टिव्ह ग्रुप बिहेवियर, १९५२)

चेंगराचेंगरीमध्ये सभोवतालच्या परिस्थितीची भर कशी पडते?

चेंगराचेंगरीला फक्त जमावामध्ये निर्माण होणारी मानसिकताच कारणीभूत ठरते, असे नाही. ज्या ठिकाणी सामूहिक मेळावे होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी जागेची योग्य रचना केल्यासही बऱ्याच चेंगराचेंगरीच्या घटना टाळता येऊ शकतात. चुन-हाओ शाओ आणि इतरांनी त्यांच्या ‘स्टॅम्पेड इव्हेंट्स आणि स्ट्रॅटेजी फॉर क्राउड मॅनेजमेंट’ (२०१८) या शोधनिबंधामध्ये या संदर्भातील अनेक गोष्टींची यादी केली आहे.

१. पुरेशा प्रकाश नसणे

२. गर्दीचा प्रवाह वेगवेगळ्या दिशांना विभागला न जाणे

३. कठडे आणि इमारतींचे कोसळणे

४. बाहेर पडण्याचा रस्ता बंद असणे

५. बाहेर पडण्याचा मार्ग किचकट असणे (उदा. बाहेर पडण्याचा दरवाजा गोलाकार फिरता असणे)

६. आगीचा धोका असणे

या गोष्टींमुळे चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये परिस्थितीची भर पडते. मोठ्या प्रमाणात एकत्र जमाव जमणाऱ्या जागेचे नियोजन करण्यासाठी प्रतिक्षेत्र लोकांची संख्या (गर्दीची घनता) महत्त्वाची आहे. चुन-हाओ शाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा गर्दीची घनता प्रतिचौरस मीटर तीन ते चार लोकांपर्यंत पोहोचते, तेव्हा लोकांना बाहेर काढण्यासाठी आठ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. जर लोक त्याहून अधिक वेळ थांबले किंवा बाहेर पडण्याच्या दरवाजाजवळ अडकले, तर गर्दीमध्ये घाबरून चेंगराचेंगरीचा धोका वाढतो. कार्यक्रमामध्ये जमणारी गर्दी कशी बाहेर पडली पाहिजे, याचा विचार आयोजकांनी आधीच करणे गरजेचे असते. के. एम. गाय आणि इतरांनी चेंगराचेंगरीचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. एक म्हणजे एकदिशीय आणि दुसरा म्हणजे दिशाहीन चेंगराचेंगरीचा प्रकार होय. एकदिशीय चेंगराचेंगरीमध्ये गर्दी एकाच दिशेने पुढे रेटली जात असते; तर दिशाहीन चेंगराचेंगरीमध्ये गर्दी अनावर होऊन कुठेही रेटली जात असते.

हेही वाचा : मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगवास; आंदोलने, उपोषणे, कारावास आणि संघर्ष; कशी होती ‘नर्मदा बचाव’ची ३९ वर्षे?

चेंगराचेंगरीचे प्रकार कसे टाळता येऊ शकतात?

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयोजकांनी उपलब्ध जागेत बसतील त्याहून अधिक लोकांना प्रवेश देऊच नये. मात्र, हे प्रत्येक वेळी शक्य होतेच, असे नाही. अशा वेळी वेगवेगळ्या दिशांना बाहेर पडण्याचे अधिकाधिक मार्ग उपलब्ध असणे गरजेचे आहे. सामूहिक मेळावे आयोजित करताना काटेकोर नियोजन आवश्यक असते. संभाव्य धोके ओळखणे आणि ते कमी करण्यासाठीचे नियोजन करणे गरजेचे असते. त्यामध्ये आयोजकांचीच भूमिका महत्त्वाची ठरते.

आजवर घडलेल्या सर्वांत मोठ्या चेंगराचेंगरीच्या घटना?

मॉस्को, रशिया (१८९६) : चेंगराचेंगरीच्या सर्वांत मोठ्या घटनेची ही पहिलीच नोंद म्हणावी लागेल. १८९६ मध्ये रशियन झार निकोलस II च्या राज्याभिषेक समारंभाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली होती. त्यामध्ये एक हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.

अलाहाबाद, भारत (१९५४) : कुंभमेळ्यामध्ये झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

लिमा, पेरू (१९६३) : पेरूमधील लिमा येथे १९६३ साली पेरू आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्यामध्ये रेफ्रीने दिलेल्या निर्णयानंतर चाहते संतप्त झाले आणि ते मैदानात घुसले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. मग जमलेल्या गर्दीची पांगापांग होताना बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ झालेल्या गर्दीत जवळपास ३२६ जणांचा मृत्यू झाला होता.

वाई, भारत (२००५) : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाईतील मांढरादेवीच्या यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ३४० जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले होते. भाविकांनी नारळ फोडल्याने निसरड्या झालेल्या पायऱ्यांवरून काही लोक खाली पडल्याने चेंगराचेंगरी झाली होती.

मिना, सौदी अरेबिया (२०१५, २०२४) : मक्केतील हज यात्रेदरम्यान अनेकदा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. २०१५ साली झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ७६९ जणांचा मृत्यू झाला होता. नुकतीच काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली असून, त्यामध्ये १३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

2024-07-03T07:11:33Z dg43tfdfdgfd