सेवा क्षेत्राची भरारी

विनिता शाह

मागील काही दशकांचा विचार केला, तर भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात उजवी बाजू म्हणजे सेवा क्षेत्रातील निर्यातीला मिळालेली गती. या गतीमुळे देशा-देशांतील व्यापारात वाढणारे अंतर रोखण्यात केवळ मदत झाली नाही, तर देशात रोजगारनिर्मितीचा स्रोतही अखंडित राहिला आहे. यात उच्च कौशल्यप्राप्त रोजगारांचादेखील समावेश आहे.

सेवा क्षेत्रात देशाचे यश पाहता जागतिक पातळीवर आपले स्थान कोठे आहे आणि भविष्यातील काय स्थिती आहे, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मासिक अहवालानुसार, गेल्या तीन दशकांत म्हणजे 1993 ते 2022 या काळात डॉलरसंदर्भात भारताची सेवा क्षेत्रातील निर्यात 14 टक्क्यांपेक्षा अधिक वार्षिक दराने वाढल्याचे दिसून येते. हे प्रमाण जागतिक सेवा निर्यातीच्या 6.8 टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय मानले जात आहे. याच कालावधीत सेवा निर्यातीत भारताचा वाटा हा 0.5 टक्क्यावरून 4.3 टक्के झाला आहे. त्यामुळे भारत जगातील सातव्या क्रमांकाचा सेवा निर्यातदार देश झाला आहे. 2001 मध्ये भारताचे स्थान 24 व्या क्रमांकावर होते. सध्या दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवा निर्यात क्षेत्रात भारत जगात दुसर्‍या आणि सांस्कृतिक तसेच मनोरंजन सेवा निर्यातीत 6 व्या स्थानावर आहे. भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्याने आणि त्यामध्ये प्रगती केल्यामुळे आपल्याला लक्षणीय लाभ झाला. भारतात कामकाजात इंग्रजी बोलणार्‍यांचे प्रमाण उल्लेखनीय आहे. तसेच इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातही अनेक कुशल उमेदवार आहेत. शिवाय, देशांतर्गत डिजिटल पायाभूत व्यवस्था आणि धोरणात्मक पातळीवर लक्ष दिल्याने भारताला माहिती-तंत्रज्ञान आणि त्यासंबंधीच्या सेवा क्षेत्रात जागतिक पातळीवर महत्त्वाचा वाटा मिळवण्यात हातभार लागला.

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरच्या (जीसीसी) केलेल्या स्थापनेवरून या गोष्टीचे महत्त्व लक्षात येते. 2015-16 पासून 2022-23 पर्यंत भारतात ‘जीसीसी’ची संख्या 60 टक्क्यांनी वाढून 1,600 पेक्षा अधिक झाली आहे. जगभरात डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे प्रमाण वाढले आहे आणि भारतालाही घवघवीत लाभ झाला आहे. डिजिटल पुरवठा सेवेच्या निर्यातीत 2019-22 यादरम्यान 37 टक्के वाढ झाली आहे आणि ही बाब भारताच्या पथ्यावर पडली. तंत्रज्ञान क्षेत्राशिवाय भारतात प्रवास निर्यात क्षेत्रदेखील सक्षम राहिले. मात्र, अजूनही महासाथीच्या परिणामाशी संघर्ष करावा लागत आहे आणि यात थोडाफार सहभाग पर्यटनाचाही आहे. भारताने परिवहन सेवा निर्यातीत चांगली कामगिरी केली आहे आणि उत्पन्नाच्या बाबतीत 2005 च्या 19 व्या स्थानावरून भारताचे स्थान 2022 मध्ये 10 वर आले.

भारताने जागतिक सेवा व्यापारातही स्पर्धा निर्माण केली आहे. प्रामुख्याने दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्राचा उल्लेख करता येईल. परंतु, मध्यम ते दीर्घ कालावधीदरम्यान अशी स्थिती राहू शकेल का? भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, बाह्य मागणी आणि किमतीची स्पर्धा ही सेवा निर्यातीवर परिणाम करणारी आहे. उदा., जागतिक जीडीपीत एक टक्क्याने झालेली वाढ ही देशाच्या सेवा निर्यातीत अडीच टक्के वाढ नोंदविते; पण वास्तविक सक्रिय विनिमय दरात एक टक्का जरी वाढ झाली, तर प्रत्यक्षपणे सेवा निर्यातीत 0.8 टक्का घसरण होऊ शकते. जागतिक आर्थिक विकास हा आगामी काळात अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. अशावेळी सेवा निर्यातीलाही प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागू शकतो. अलीकडच्या विश्लेषणानुसार, विकसित अर्थव्यवस्था असलेले देश हे किनारपट्टीलगतच्या देशांशी व्यापार करण्यावर भर देत आहेत. याला भूराजकीय तणावदेखील कारणीभूत आहे; पण भारतीय निर्यातदारांसाठी ही स्थिती चिंताजनक आहे. एवढेच नाही, तर भारतासाठी आर्टिफिशियल इंटेलिजिन्सचाही धोका या क्षेत्रात आहे. या सर्वांचा सेवा व्यापारावर कसा परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही; पण भारताला दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञान सेवा निर्यातीत तुलनेने अधिक पाठबळ मिळू शकते.

2024-05-02T02:37:33Z dg43tfdfdgfd