सहा महिन्यांपूर्वी सिडकोत अपमान, आता अध्यक्ष होऊन आमदारकीची ताकद दाखवली : संजय शिरसाट

मुंबई : सहा महिन्यापूर्वी  ज्या सिडकोत माझा अपमान एका अधिकाऱ्याने केला होता, त्याच सिडकोचा अध्यक्ष होऊन मी आमदाराची काय ताकद असते हे दाखवली असं वक्तव्य सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आमदार असलेले संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर गुरूवारी त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी ABP माझाशी बोलताना त्यांनी सिडको महामंडळाचाच अध्यक्ष का झालो याबाबत मन मोकळे केले. 

संजय शिरसाट म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी सिडकोत जनतेच्या कामासाठी आल्यानंतर सिडको अधिकाऱ्याने आपला अपमान केला होता. त्याची सल मनात असल्याने एका आमदाराची  ताकद काय असते हे दाखवण्यासाठी सिडको अध्यक्षपद घेतलं. यापुढे सिडकोत गेल्या अनेक वर्षापासून अडकलेले धोकणात्मक निर्णय सोडवून जनतेला न्याय देणार.

सिडको अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला शिरसाटांचा नकार

ऐरोलीतील 80 एकर भूखंड उद्योगपतीच्या घशात जाऊ देणार नाही, शहरातील तज्ज्ञ लोकांचे अभिप्राय घेवूनच पुढील पाऊल टाकणार असं संजय शिरसाट  म्हणाले. ऐरोली भागातील 13 हजार कोटी रूपयांची 80 एकर जागा एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचा डाव सर्वपक्षीय आमदारांनी उधळला होता. मात्र परत एकदा सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोर्ड मिटिंगमध्ये हा प्रस्ताव ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र नवनिर्वाचित सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यास नकार दिला. 

ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या मेगा सिटी गृहप्रकल्पाची इंत्यभूत माहिती समोर आणावी अशा सूचना त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय धरतीवर होणाऱ्या या मेगासिटीसाठी शहरातील तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचना घेऊनच सिडको पुढचे पाऊल टाकेल असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा: 

2024-09-19T18:37:41Z dg43tfdfdgfd