विजेच्या धक्क्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

कोडोली, पुढारी वृत्तसेवा : येथील सांजसावली वृद्धाश्रम गार्डनमध्ये सौरऊर्जा लॅम्पसाठी लोखंडी खांब उभा करत असताना वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत असलेल्या सुरज प्रकाश निकम (वय 25, रा. भेंडवडे, ता हातकणंगले) याचा जागीच मृत्यू झाला; तर संदीप बंडू चव्हाण व दिग्विजय संजय खानविलकर (दोघे रा. भेंडवडे) गंभीर जखमी झाले. जखमींवर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोडोली येथील सांजसावली वृद्धाश्रमच्या गार्डनच्या सभोवती चार सौरऊर्जा लॅम्पचे 25 फूट उंचीचे लोखंडी खांब बसविण्याचे काम गुरुवारी रात्री दहाच्या दरम्यान सुरज निकम, संदीप चव्हाण व दिग्विजय खानविलकर या तिघांनी सुरू केले. वृद्धाश्रमाच्या पूर्वेस लोखंडी खांब उभा करत असताना तो खांब उसाच्या शेतातील महावितरणच्या वीजवाहक तारांवर कोसळल्याने सुरज याच्या दोन्ही हाताला व डोक्याला जोराचा धक्का बसल्याने तो जमिनीवर कोसळला. संदीप चव्हाण व दिग्विजय खानविलकर या दोघांनाही जोरदार धक्का बसल्याने ते बाजूला फेकले गेले.

दोघांनी जखमी अवस्थेत असतानाही जोरदार आरडाओरडा केल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरज निकम याला उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी चव्हाण व खानविलकर या दोघांवर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरज निकम हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत होता. त्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे भेंडवडे गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाले असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग करीत आहेत.

पूर्वकल्पना न देता काम?

वृद्धाश्रम गार्डन परिसरामध्ये सौर ऊर्जा लॅम्पसाठी लोखंडी खांब बसविण्याचे काम गुरुवारी रात्री दहा वाजता सुरू करीत आहोत, अशी आपणास कोणतीही कल्पना न देता प्रत्यक्षात ठेकेदाराने हे काम सुरू केले. या कामाची पूर्वकल्पना दिली असती खबरदारीच्या उपाययोजना केल्या असत्या आणि ही घटना घडली नसती, अशी माहिती वृद्धाश्रमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत जमणे यांनी दिली.

2024-04-27T02:02:43Z dg43tfdfdgfd