मुख्यमंत्र्यांच्या सहीअभावी रखडल्या 2200 बस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ह्या म्हणीचा सामान्य जनतेला नेहमीच अनुभव येतो तसाच प्रकार एस. टी. महामंडळालाही आला आहे. महामंडळासाठी बसेस खरेदी करण्यासाठी लागणार्‍या निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने एसटीला मिळणार्‍या 2200 गाड्या रखडल्या आहेत. याचा फटका एसटी कर्मचारी व प्रवासी यांना बसत आहे. यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता करूनही मुख्यमंत्र्यांकडून सही न करण्याचे कारण समजत नसून, यासाठी सरकारला काही अपेक्षित असल्याची अशी शंका महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

एसटीच्या जवळपास 10 हजार बस ह्या मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे दुरुस्तीचे काम करून यांत्रिकी कर्मचारी हैराण झाले आहेत. याशिवाय ह्या गाड्या रस्त्यावर चालवताना चालकांना खूप त्रास होत आहे. एसटी महामंडळाने अशोक लेलँड कंपनीकडून बॉडी बांधणीसह तयार 2200 बसेसची निविदा मंजूर केलेली आहे.

पण त्यासाठी लागणारा निधी मात्र सरकारकडून आलेला नाही. वर्कऑर्डर दिल्याशिवाय गाड्या ताब्यात येऊ शकणार नाहीत आणि निधी प्राप्त झाल्याशिवाय महामंडळ वर्कऑर्डर देऊ शकत नाही. कारण सरकारकडून बजेट मध्ये तरतूद करण्यात आलेला निधी कधीच वेळेवर मिळत नाही. त्यामुळे विनाकारण पुरवठादार व महामंडळ यांच्यात संघर्ष उभा राहतो.

या पूर्वीचा अनुभव पाहता कधी कधी अशी प्रकरणे न्यायालयात जातात व साहजिकच त्याचा परिणाम महामंडळाच्या एकंदर आर्थिक स्थितीवर तसेच कामकाजावर होत असतो .या बस खरेदी प्रकरणात सुद्धा आचार संहिता लागू होण्यापूर्वी सहीसाठी फाईल मुख्यमंत्री कार्यालयात देण्यात आली आहे. या निविदा मंजूर करण्यात आलेल्या कंपनीने संपर्क साधावा या साठीच ह्या फाईलवर सही करण्यास करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.

ऐन सुट्ट्यांच्या हंगामात गाड्या कमी पडणार आहेत वर्क ऑर्डर दिल्या नंतर तीन महिन्यांनी गाड्या यायला सुरुवात होणार आहे.व तो पर्यंत शाळा, कॉलेजच्या सुट्ट्या व जत्रा हंगाम संपणार आहे.व त्या मुळे ऐन हंगामात महामंडळावर उत्पन्न बुडणार आहे. प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तरी तात्काळ यातून योग्य मार्ग काढून प्रसंगी निवडणुक आयोगाची परवानगी घेऊन तिढा सोडवण्यासाठी महामंडळाला निधी प्राप्त करून द्यावा, असेही बरगे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

2024-04-26T09:44:52Z dg43tfdfdgfd