महायुतीचे जागावाटप अखेर पूर्ण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना बुधवारी महायुतीचे जागावाटपाचे चित्र अखेर स्पष्ट झाले. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी सर्वाधिक 28 जागा भाजपला गेल्या असून, त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी 4 आणि रासप 1 जागा लढवत आहे.

दक्षिण मुंबईसह मुंबईतील तीन जागा आणि ठाणे, पालघर व नाशिक या सहा जागांवरून प्रामुख्याने रस्सीखेच सुरू होती. पालघरचा उमेदवार अधिकृतपणे जाहीर झाला नसला तरी विद्यमान खासदार राजेंद्र गावीत हेच भाजपचे उमेदवार असतील, असे उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केल्याने ही जागा स्वत:कडे घेण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा मिळवण्यात शिंदे गट यशस्वी ठरला आहे.

2019 च्या तुलनेत महायुतीत आणखी एक प्रमुख पक्ष सामील झाल्याने भाजपच्या जागांमध्ये घट होईल, असा अंदाज असताना प्रत्यक्षात 2019 च्या तुलनेत तीन अधिक जागा मिळविण्यात भाजप यशस्वी झाली.

भाजप – 28 : नंदुरबार (हिना गावित), धुळे (सुभाष भामरे), जळगाव (स्मिता वाघ), रावेर (रक्षा खडसे), अकोला (अनुप धोत्रे), अमरावती (नवनीत राणा), वर्धा (रामदास तडस), नागपूर (नितीन गडकरी), भंडारा-गोंदिया (सुनील मेंढे), गडचिरोली-चिमूर (अशोक नेते), चंद्रपूर (सुधीर मुनगंटीवार), नांदेड (प्रताप पाटील चिखलीकर), जालना (रावसाहेब दानवे), दिंडोरी (भारती पवार), भिवंडी (कपिल पाटील), मुंबई उत्तर (पीयुष गोयल), मुंबई पूर्व (मिहिर कोटेचा), मुंबई उत्तर मध्य (उज्ज्वल निकम), पुणे (मुरलीधर मोहोळ), अहमदनगर (सुजय विखे पाटील), बीड (पंकजा मुंडे), लातूर (सुधाकर श्रुंगारे), सोलापूर (राम सातपुते), माढा (रणजितसिंह नाईक निंबाळकर), सांगली (संजयकाका पाटील), सातारा (उदयनराजे भोसले), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (नारायण राणे), पालघर (उमेदवार जाहीर झालेला नाही).

शिवसेना -15 : बुलढाणा (प्रतापराव जाधव), रामटेक (राजू पारवे), यवतमाळ-वाशीम (राजश्री पाटील), हिंगोली (बाबुराव कदम कोहळीकर), छत्रपती संभाजीनगर (संदीपान भुमरे), नाशिक (हेमंत गोडसे), कल्याण (श्रीकांत शिंदे), ठाणे (नरेश म्हस्के), मुंबई उत्तर पश्चिम (रवींद्र वायकर), मुंबई दक्षिण मध्य (राहुल शेवाळे), मुंबई दक्षिण (यामिनी जाधव), मावळ (श्रीरंग बारणे), शिर्डी (सदाशिव लोखंडे), कोल्हापूर (संजय मंडलिक), हातकणंगले (धैर्यशील माने)

राष्ट्रवादी 4 : बारामती (सुनेत्रा पवार), शिरुर (शिवाजीराव आढळराव पाटील), धाराशिव (अर्चना पाटील), रायगड (सुनिल तटकरे).

रासप 1 : परभणी (महादेव जानकर)

2024-05-02T07:23:16Z dg43tfdfdgfd