प्रश्न नाविक-खलाशांच्या सुरक्षिततेचा

- हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

इस्रायल-हमास संघर्ष भलेही पश्चिम आशियाच्या भूमीवर सुरू असेल, पण त्याची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. भारतही त्यापासून सुटू शकलेला नाही. याचे कारण इराण पुरस्कृत हुती बंडखोरांकडून भारताकडे येणार्‍या व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात आहे. अलीकडेच इराणने ‘एमएससी एरिज’ हे कंटेनर जहाज जप्त केले होते. ‘एमव्ही डाली’ या जहाजाने बाल्टिमोर शहरातील एका पुलाला धडक मारली होती. ते जहाज गेल्या चार आठवड्यांपासून तिथेच अडकले आहे. या पार्श्वभूमीवर नाविक-खलाशांच्या सुरक्षिततेसाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

इराणने जप्त केलेल्या ‘एमएससी एरिज’ या कंटेनर जहाजावरील भारतीय महिला कॅडेट केरळमधील सुश्री अ‍ॅन टेसा जोसेफ 18 एप्रिलला भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे सुखरूप भारतात परत आल्या. बाकीचे भारतीय क्रू अजूनही तिथे अडकले आहेत. सोडलेल्या खलाशांची संख्या वाढत आहे.

‘एमव्ही डाली’ या जहाजाने बाल्टिमोर शहरातील एका पुलाला धडक मारली होती. ते जहाज गेल्या चार आठवड्यांपासून तिथेच अडकले आहे. जहाजावरील नाविकांना केव्हा बाहेर काढण्यात येईल, याविषयी काहीही सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. 6 मार्च रोजी हुती क्षेपणास्त्राने बार्बाडोस-ध्वजांकित व्यापारी जहाज ‘ट्रू कॉन्फिडन्स’वरील तीन क्रू सदस्य मारले गेले, तर दोघे गंभीर जखमी झाले. विविध युद्धे आणि अनेक कारणांमुळे नाविक आणि खलाशांना वेगळ्या प्रकारचा त्रास होत आहे. त्यांचे मालक त्यांना आणि त्यांच्या जहाजांना बेवारशी सोडून देत आहेत. या सोडलेल्या खलाशांची संख्या सतत वाढत असल्याने जगाने त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष देणे, तपासात मदत करणे आवश्यक आहे. 18 डिसेंबर रोजी सिएरा लिओन-ध्वज असलेल्या ‘ग्रँड सनी’ या मालवाहू जहाजावर काम करणार्‍या खलाशांना कळाले की, ते चीनच्या नान्शा बंदरात अडकून पडले आहेत. जहाजाचा मालक, थाऊजंड स्टार इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीबद्दल कोणतीही माहिती नाही.

इटलीच्या मेसरात अनेक नाविक तीन वर्षांपासून कॅमेरूनच्या ध्वजांकित मालवाहू जहाजावर अडकून पडले आहेत. सागरी नियमांनुसार, अगदी कठीण काळात आलेल्या जहाजमालकांनाही त्यांची जहाजे आणि कर्मचारी यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची परवानगी नाही; परंतु बरेच जण आर्थिक फायद्यासाठी दुर्लक्ष करतात. आयटीएफच्या अहवालानुसार, 2023 वर्षी 132 जहाजे त्यांच्या मालकांनी बेवारस सोडली होती. ती संख्या 2022 च्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढली आहे. अनेक जहाजमालक जुन्या आणि खराब, देखभाल केलेल्या जहाजांसह वारंवार ध्वज नोंदणी बदलतात, ज्यामुळे कायदे तोडल्यानंतर त्यांना लपणे सोपे होते. यात 1,400 जहाजांचा समावेश आहे. गॅबॉन या देशाचे आपण नाव फारसे ऐकलेले नाही, ते जगातील सर्वात मोठे ध्वज राज्य कसे असू शकते? आज गॅबोनीज ध्वजाखाली जाणारी 98 टक्के जहाजे उच्च-जोखीम मानली जातात. गॅबोनीज ध्वजाखाली जाणार्‍या जहाजांचे मालक शोधणे जवळजवळ अशक्य आहे.

अनेक वेळा व्यापारी जहाजांना वेगवेगळ्या बंदरांत त्यांनी पैसे न भरल्यामुळे किंवा इतर आर्थिक कारणांमुळे अटक होते. अशी अटक झालेली अनेक जहाजे आज अनेक देशांच्या बंदरांमध्ये असतात. तुर्कस्तानमध्ये अंबरली बंदरामध्ये ‘फत्मा युलूल’ नावाचे जहाज अडकले आहे, ज्यामध्ये 12 भारतीय नाविक आहेत. ते त्या बंदरात जहाजावर ओपन तुरुंगामध्ये आहेत. अशा जहाजांचे कर्मचारी डायरेक्टर जनरल शिपिंगला पत्र लिहून, ई-मेल करून किंवा फोन कॉल करून परिस्थितीची माहिती देतात’ परंतु डायरेक्ट जनरल शिपिंगकडून होणारी कार्यवाही ढिली असते. अनेक वेळा दुसर्‍या देशांच्या कायद्यामध्ये अडकले असल्यामुळे, नाविकांना तिथून बाहेर काढण्यासाठीकरिता शिपिंग, फॉरेन मिनिस्ट्री, कायदा मिनिस्ट्री या सर्वांच्या एकत्रित कार्यवाहीची गरज असते, जी वेगाने होत नाही.

‘मेरीटाईम लेबर कन्व्हेंशनल 2006’च्या कायद्याप्रमाणे नाविकांना बेवारस सोडून दिले, हे तेव्हा म्हटले जाते, जेव्हा नाविकांना त्यांचा पगार मिळत नाही किंवा परत जाण्यासाठी हवाई तिकीट मिळत नाही. असेच एक जहाज ‘एम.व्ही. अरझक मोईन’ हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये 3 वर्षांहून जास्त काळ अडकले होते. तिथल्या नाविकांना, ज्यामध्ये 12 भारतीय होते, पगार मिळत नव्हता, खाण्यापिण्याचीही व्यवस्था नव्हती. एका मोठ्या कायद्याच्या लढाईनंतर त्यांची सुटका केली. आज जगातील 13 ते 15 टक्के व्यापारी जहाजांवर काम करणारे नाविक हे भारतीय आहेत. अनेक भारतीय नागरिक हे विविध परदेशी कंपन्या, ज्या वेगवेगळ्या देशांत नोंदणी झालेल्या आहेत, त्यांवर काम करतात; मात्र जेव्हा धोकादायक परिस्थिती निर्माण होते; जसे की, समुद्रात झालेले अपघात किंवा बंदरात झालेले अपघात, अशावेळी त्या कंपन्या आपल्या नाविकांना वाचवण्याऐवजी जहाजांना मोकाट सोडून देतात. अनेक नाविकांना पगार मिळत नाही. अनेक वेळा जेवण आणि पाण्याची कमतरता भासते.

एका प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे 400 हून जास्त भारतीय नाविकांना त्यांच्या कंपन्यांनी वार्‍यावर धोकादायक परिस्थितीत सोडून दिलेले आहे. त्यांना सोडवणे महत्त्वाचे आहे. अडकलेले अनेक नाविक गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून समुद्रात नोकर्‍या शोधतात. चलाख मॅनिंग एजंट किंवा शिपिंग कंपन्या त्यांना धोकादायक जहाजांवर पाठवतात, त्यांचे वेतन रोखतात. अनेक वेळा अर्धशिक्षित नाविकांना जहाजावर पाठवले जाते. अर्धशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडून जास्त काम करवले जाते, पगार कमी दिला जातो, अनेक वेळा त्यांना बंधक बनवले जाते. म्हणून भारताबाहेर जाणार्‍या प्रत्येक नाविकाचे शिक्षण हे डीजी शिपिंगकडून तपासले जावे. कुठल्या एजंटच्या माध्यमातून त्यांना कामावर पाठवले जातेे, त्याचेही रेकॉर्ड आपल्याकडे असण्याची गरज आहे.

2024-05-04T04:15:41Z dg43tfdfdgfd