पैगंबरांचे अंतिम प्रवचन

शफीक देसाई

मुहम्मद (स.) पैगंबरांनी अंतिम प्रवचन इस्लामी वर्षातील शेवटच्या ‘जिलहिज्ज’ महिन्यात 10 हिजरीमध्ये (सुमारे 1430 वर्षांपूर्वी) ‘आराफत’ पर्वताच्या ‘उराणा’ घाटीमध्ये दिले. पैगंबरांनी एक लाखाहून अधिक अनुयायांसमवेत शेवटची हजयात्रा केली. त्यांच्यासमोर या ऐतिहासिक व क्रांतिकारक प्रवचनामधून इस्लामची शिकवण व एकेश्वराचा संदेश दिला. यालाच पैगंबरांचा ‘विदाई उपदेश’ (खुत्बतुल विदा) असे म्हटले जाते. यातून पैगंबरांनी जीवनाविषयी अतिशय महत्त्वाचा उपदेश केला. याला मानव अधिकारांचा पहिला जाहीरनामा, असे म्हटले जाते.

पैगंबरांच्या या प्रवचनातून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यासोबत मानवाचे मूलभूत हक्क-अधिकार, कर्तव्य, समाजाप्रति उत्तरदायित्व व जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. पैगंबरांनी प्रवचनाच्या सुरुवातीस एकच एक विश्वात्मक परमेश्वराची महती सांगितली. एकेश्वरवादाचा उद्घोष केला. याबद्दलचा आपला विश्वास, साक्ष व ग्वाही दिली. परमेश्वराच्या सत्य, न्याय, नैतिकतेचा आधार उद्घृत केला. हा आधार तुम्हाला सत्य व चांगुलपणाच्या मार्गावर नेतो आणि वाईट गोष्टींपासून रोखतो. सत्कर्म, सदाचार व सद्व्यहाराचा योग्य मार्ग दाखवतो. वाईट गोष्टी व दुष्कृत्यांपासून तुम्हाला अभय देतो. यानंतर त्यांनी असेही सांगितले की, मी तुमच्यासारखाच एक साधा, सामान्य माणूस आहे आणि एकमेवाद्वितीय परमेश्वराचा फक्त संदेश देणारा आहे. प्रत्येकाचे जीवन अनमोल आहे आणि प्रत्येकाला सन्मानाने जगता आले पाहिजे.

प्रत्येकाचे जीवन, त्याची मालमत्ता व इज्जत-अब्रू अतिशय पवित्र आणि अभंग आहे. प्रत्येक माणसाला आत्मसन्मान, सुरक्षा आणि हक्क अधिकारानुसार जीवन जगता आले पाहिजे. तुम्हाला जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे; पण तुमच्या कर्मास आणि कृतीबद्दल तुम्ही स्वतःच जबाबदार आणि उत्तरदायी आहात. पित्याच्या अपराधाबद्दल पुत्र जबाबदार नाही, तसेच पुत्राच्या कृत्याबद्दल पिता जबाबदार नाही.

ज्यांच्याकडे कोणी एक ‘विश्वस्त’ म्हणून अनामत, ठेव ठेवली असेल, तर ती त्याने प्रामाणिकपणे परत करावी. व्याज घेण्याची सक्त मनाई आहे. व्याज निषिद्ध आहे. आपण मुद्दल बाकी परत घेऊ शकता; पण अडचणीतील माणसांसाठी मुद्दलही सोडल्यास चांगली गोष्ट आहे. याप्रसंगी पैगंबरांनी स्वतः गरजवंतांना दिलेली रक्कम सोडून दिली. स्त्रियांशी सन्मानजनक व्यवहार करा, असे पैगंबरांनी सांगितले. एक पती म्हणून अल्लाच्या साक्षीने व हमीवरच तिचा हात तुमच्या हातात दिलेला आहे. दोघांनाही समान अधिकार दिलेले आहेत. तुमच्या पत्नीवर जसे तुमचे अधिकार आहेत, तसेच पत्नीचेही तुमच्यावर अधिकार आहेत. दोघांनीही एकमेकांचा सन्मान आणि आदर राखला पाहिजे. मालमत्तेच्या बाबतीत प्रत्येक माणसाला त्याचा वारसा हक्क व वाटा मिळाला पाहिजे. प्रत्येकाने मुलांना वारसा हक्काचा योग्य वाटा दिला पाहिजे. त्यांचा वारसा हक्क नाकारू नये.

मुलांनीही मालमत्तेसाठी वाडवडिलांखेरीज इतरांशी वारसा संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नये. ही गोष्ट निषेधार्ह आहे. गुलामांना मुक्त करा. नोकरांनाही सन्मानजनक वागणूक द्या. एखादा काळा गुलाम जर इस्लामचा अनुयायी झाला आणि अमीर (नेता) बनला, तर त्याचे समर्थन करा आणि त्याचे आज्ञापालन करा. पैगंबर पुढे म्हणाले की, यानंतर मी तुमच्यामध्ये असेन की नाही, हे सांगता येत नाही; पण माझ्यामागे एक परमेश्वराचा संदेश ‘कुराण’ व प्रेषितांची ‘सुन्नाह’ (जीवन) तुमच्यासाठी आदर्श असेल. त्याला मजबुतीने पकडून राहा म्हणजे तुम्ही जीवनात भरकटणार नाही. इस्लामची पाच फर्ज (अनिवार्य कर्तव्ये) अंगीकारा. ईमान, नमाज, रोजा, जकात आणि हजयात्रा यांची यथाशक्ती जोपासना करा. परमेश्वराचे भय बाळगा. तुमच्या सर्वांचा स्वामी एकच आहे आणि तुमचा पूर्वजही एकच आहे. तुम्ही सर्व हजरत आदमचे वंशज आहात. त्यामुळे सर्व समान आहात, एकमेकांचे बांधव आहात. कोणीही उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ नाही. कोणाही अरबाला अरबेतरांवर वर्चस्व व प्राधान्य नाही तसेच कोणाही अरबेतराला अरबांवर मोठेपणा नाही. तसेच गोर्‍या माणसांना काळ्यांवर आणि काळ्यांना गोर्‍यांवर श्रेष्ठत्व नाही. जे प्राधान्य आहे, ते निव्वळ इस्लामचा सच्चा अनुयायी म्हणून आहे. पैगंबर शेवटी म्हणाले, ‘ये लोकहो, मी इमानेइतबारे माझे कार्य केले आहे. मी परमेश्वराचा संदेश आणि एका परिपूर्ण दीन ‘इस्लाम’चा द़ृढविश्वास आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. आपण आणि परमेश्वर याचे साक्षीदार आहात.’

2024-09-15T23:46:53Z dg43tfdfdgfd