नक्षल्यांनी केली आत्मसमर्पित नक्षल्याची हत्या

गडचिरोली : पुढारी वृत्‍तसेवा

नक्षल्यांनी काल (गुरूवार) रात्री भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे वास्तव्यास असलेल्या जग्गू उर्फ जयराम कोमटी गावडे (वय ४०) नामक आत्मसमर्पित नक्षल्याची गोळी झाडून हत्या केली. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे.

Maharashtra Vidhansabha Election 2024 | मविआमध्ये विधानसभा जागावाटपावरील चर्चेसाठी काँग्रेसची समिती जाहीर

जग्गू उर्फ जयराम गावडे व त्याची पत्नी रासो उर्फ देवे झुरु पुंगाटी हे दोघे २००७ पासून नक्षल्यांच्या भामरागड दलमचे सदस्य म्हणून काम करीत होते. परंतु ७ जुलै २०१७ रोजी दोघांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर ते गावात राहून शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होते. परंतु रात्री सशस्त्र नक्षल्यांनी घरी जाऊन जयरामला मारहाण केली. त्यानंतर गावाबाहेर नेऊन आरेवाडा-हिदूर मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ त्याची हत्या केल्‍याचे पोलिसांनी सांगितले. मृत जयराम गावडे हा पोलिस खबऱ्या नव्हता. हिंसेचा मार्ग सोडून तो शांततेच्या मार्गाने जीवन जगत होता. परंतु नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या खोट्या कारणावरुन निरपराध नागरिकाची हत्या केली, असे पोलिसांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांचे अनमोल पोर्ट्रेट | तब्बल २७ हजार हिऱ्यांनी साकारले अनोखे चित्र

१७ जुलैला पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी एटापल्ली तालुक्यातील वांडोली गावालगत झालेल्या चकमकीत १२ नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. यामुळे नक्षली आक्रमक झाले असून, ते निरपराध नागरिकांची हत्या करीत आहेत. २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात. या सप्ताहात ते दिवंगत नक्षल्यांची स्मारके बांधून त्यांना श्रद्धांजली वाहतात. अनेक ठिकाणी बॅनर लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सप्ताहापूर्वीच नक्षल्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्याची हत्या केल्याने खळबळ माजली आहे.

2024-07-26T12:53:09Z dg43tfdfdgfd