तडका : आणखी एक तुतारी

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दररोज बारामती मतदारसंघ काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत आहे. एकाच घरातील नणंदबाई आणि वहिनीसाहेब एकमेकींच्या विरुद्ध उभ्या आहेत, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. या मतदारसंघांमध्ये त्याही पुढे जाऊन अनेक गमती जमती घडत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या बातमीप्रमाणे चक्क शरद पवार नावाचेच एक उमेदवार उभे आहेत. या उमेदवाराने निवडणूक रिंगणात एन्ट्री घेऊन नवीनच पेच उभा केला आहे. म्हणजे दोन प्रबळ महिला उमेदवारांमध्ये ही लढत होणार होती, त्यांच्यापैकी ओरिजनल कोण, या विषयाचा आधीच वाद रंगलेला होता.

शिवाय बारामती कोणाची, याही प्रकरणाचा फैसला या ‘इलेक्शन’मध्ये होणार आहे, असे म्हटले जात होते. त्यात मूळ बारामतीचाच असलेला शरद पवार नावाचाच उमेदवार आल्यामुळे आणि तो पुरुष उमेदवार असल्यामुळे या सामन्यामध्ये रंगत येईल की काय, असे वाटायला लागले आहे. एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे असण्याचे बर्‍याच मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. उदाहरणार्थ, रायगडमध्ये अनंत गीते या नावाच्या मूळ उमेदवाराशिवाय तीन उमेदवार उभे आहेत.

बारामतीमध्ये राष्ट्रीय नेते शरद पवार या नावाचा उमेदवार आल्यामुळे आणि जे लोक आपल्या नेत्यावर भक्ती ठेवतात, ते त्याचे नाव दिसले की बटण दाबतील, अशी शक्यता असल्यामुळे सदरील उमेदवार किती मते खातो, याविषयी दोन्ही महिला उमेदवारांना काळजी वाटल्यास नवल नाही. बारामतीमध्ये पवार आडनावाचे असंख्य लोक असतील. आपल्या मुलाबाळांचे नाव ठेवताना ते प्रसिद्ध आणि कर्तृत्ववान नेत्याच्या नावावर ठेवावे, असे आई-वडिलांना वाटत असते.

याच मतदारसंघातून चिन्हाबाबतही काही गोंधळ समोर आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि हे चिन्ह सर्वत्र पोहोचावे यासाठी पक्ष पुरेपूर प्रयत्न करत आहे. त्याच वेळेला आणखी एका उमेदवाराला सारखे दिसणारे चिन्ह मिळाले आहे. त्या चिन्हाचे नाव आहे ट्रंपेट. ट्रंपेट म्हणजे बँड पथकामध्ये एक मुख्य वाद्य असते, जे पूर्ण पथकाचे संचलन करत असते. बारामती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सोहेल शहा शेख यांना आयोगाने ट्रंपेट हे चिन्ह दिले आहे; पण याला मराठीत तुतारी असा शब्द दिला आहे. दोन्ही चिन्हांच्या नावांमध्ये साधर्म्य आहे, त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो, असा आक्षेप राष्ट्रवादीच्या तुतारी गटाने निवडणूक आयोगाकडे नोंदवला आहे.

याचा अर्थ बारामतीतील मतदारांना ज्या कोणाला मतदान करायचे आहे, त्या मतदाराचे नावही नीट वाचायचे आहे, त्याचे चिन्हही नीट पारखून घ्यायचे आहे आणि नंतर त्यावर मतदान करायचे आहे. म्हणजे दिसली तुतारी की, दाब बटण असे केले तर सोहेल शहा यांना मतदान जाण्याची शक्यता आहे. तुतारी वाजवणारा माणूस दिसला तर साहेबांच्या पक्षाला मत जाणार आहे. साहेबांवर प्रेम करणार्‍या लोकांनी नुसते शरद पवार हे नाव वाचून बटण दाबायचे ठरवले, तर दस्तुरखुद साहेबांच्या नावाचा म्हणजे शरद पवार नावाचा एक उमेदवार उभा आहे. खर्‍या अर्थाने बारामतीकरांची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. शिवाय अटीतटीने लढणार्‍या उमेदवारांना आपल्या मतदारांना त्याप्रमाणे प्रशिक्षितसुद्धा करावे लागणार आहे.

2024-04-24T05:01:46Z dg43tfdfdgfd