ठाणे: गणेशोत्सवात आदिवासींच्या हातांना रोजगार

नेवाळी : शुभम साळुंके

गणेशोत्सवात यंदा भक्तांकडून पर्यावरण पूरक सजावटीकडे कल दिला आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आदिवासींनी रानावनातील फुले, वृक्षांच्या फांद्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यंदा नागरिकांकडून देखील मोठी मागणी या रान पान, फुलांना वाढल्याने आदिवासींच्या उद्योगाला चांगली झळाळी मिळाली आहे. कल्याण सह आजूबाजूच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आदिवासी रान मेवा घेऊन विक्रीसाठी दाखल झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

कल्याण डोंबिवली परिसरातील बाजारपेठेत पर्यावरण पूरक साहित्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यंदा कर्जत, अंबरनाथपासून आदिवासींनी रान फुले, वृक्षांच्या फांद्या बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. गणपती बाप्पासमोर सजावटीसाठी निराळ्या पद्धतीची फुल आणि वृक्षांच्या फांद्या असल्याने भक्तांकडून देखील त्यांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजारपेठेत सर्वाधिक तेरड्याची रोप व फुलं, केळीचे खांब, रान हळदीची फुले, बेल यांसह अन्य साहित्याची सर्वाधिक विक्री जोमाने सुरू आहे. त्यामुळे यंदा आदिवासींची उपजीविका रान सजावटीच्या साहित्याने तेजीत आल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मागणी सर्वाधिक असल्याने त्यांचे दर वधारले आहेत. त्यामुळे सध्या आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात रानावनातून या साहित्याची विक्री शहरात करण्यासाठी दाखल झाले आहेत. कल्याणसह अंबरनाथ, दिवा रेल्वे स्थानक परिसरातही आदिवासींनी साहित्य विक्रीचे उद्योग गणेशोत्सवात सुरू केले आहेत. कमी किंमतीत सर्वाधिक साहित्य मिळत असल्याने भक्तांचा फुले पाने खरेदीकडे कल दिसून येत आहे.

प्रकाश चव्हाण, खरेदीदार, कल्याण दिसायला चांगली असलेली ही रान सजावटीची फुले व साहित्य इतर साहित्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. पर्यावरण पूरक देखावा बाप्पांसमोर सादर करायला हे पर्यावरण पूरक साहित्य अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे आम्ही आदिवासींना थेट ऑर्डर करून साहित्य मागवत आहोत. कमी किमतीत चांगल्या प्रकारचे साहित्य मिळत आहे.प्रकाश कांबडी, आदिवासी विक्रेता दरवर्षी पेक्षा यंदा रानातील साहित्याची मागणी जास्त आहे. त्यामुळे आम्ही कर्जतमधून हे साहित्य विकायला कल्याणमध्ये आलो आहोत. यंदा दर देखील चांगले असून सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या प्रमाणात थेट ऑर्डर देऊन खरेदी केली जात आहे.

2024-09-07T10:47:25Z dg43tfdfdgfd