टोळीयुद्धाचा थरार ; सांबरेवाडीतील गोळीबारात एकाचा मृत्यू

सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याच्या घेरा सिंहगड सांबरेवाडीत वर्चस्ववादातून दोन गटांच्या टोळीयुद्धात बेछूट गोळीबाराने सिंहगडाची दरी-खोरी हादरली. गावठी पिस्तूल, बंदुकीसह कोयत्यांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 15) मध्यरात्री एकच्या सुमारास दुर्गम सांबरेवाडीतील मुख्य चौकात घडला. रोहित धर्मेंद्र ढिले (वय 22, रा. खानापूर, ता. हवेली) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, सोमनाथ अनंता वाघ (वय 25, रा. खानापूर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे.

हवेली पोलिसांनी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने घटना घडल्यानंतर डोंगर-दर्‍या-खोर्‍यांत पायपीट करत अवघ्या आठ-दहा तासांत काही आरोपींना जेरबंद केले. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात दोन्ही टोळ्यांनी एकमेकांविरोधात फिर्यादी दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही टोळ्यांतील 18 जणांवर 302, 3/25 आदी कलमाखाली गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सिंहगड, राजगडच्या दुर्गम डोंगराळ भागात, तसेच ठिकठिकाणी लपून बसलेल्या दोन्ही गटांतील 10 जणांना रविवारी सायंकाळी हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले.

पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या देखरेखीखाली हवेलीचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे व सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांचे पथक याप्रकरणी तपास करत आहेत. मयत रोहित ढिले याचा भाऊ ओंकार धर्मेंद्र ढिले व जखमी सोमनाथ वाघ यांचे नातेवाईक सुरेश तांगुदे यांनी एकमेकांविरोधात फिर्यादी दाखल केली आहे. सोमनाथ अनंता वाघ, केतन जावळकर, प्रथमेश जावळकर, गणेश जावळकर, संग्राम बाळासाहेब वाघ, तेजस वाघ, आकाश वाघ, वैभव पवार, सुमीत सपकाळ (सर्व रा. खानापूर), मंगेश ऊर्फ मुन्ना दारवटकर (रा. कोंडगाव, ता. राजगड), वैभव जागडे (रा. आंबेड), स्वप्निल चव्हाण (रा. खामगाव छत्र) अशी एका टोळीतील आरोपींची नावे आहेत, तर मयत रोहित ढिले (खानापूर), विकास ऊर्फ पांड्या नारगे, संतोष कोंडके (दोघे रा. सांबरेवाडी) व प्रवीण (पूर्ण नाव नाही) अशी दुसर्‍या टोळीतील आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी 18 ते 25 वयोगटांतील आहेत.

हवेली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार म्हणाले, वर्चस्ववादातून दोन गटांतील युवकांमध्ये रस्त्यावरून ये-जा करताना शाब्दिक बाचाबाची सुरू होती. मध्यरात्री एकच्या सुमारास सांबरेवाडीत दोन्ही गटांतील युवक भांडणे मिटवण्यासाठी एकत्र जमा झाले. त्या वेळी एकमेकांना गावठी पिस्तूल, बारा नळीच्या बंदुकीने गोळीबार करण्यात आला. तसेच, कोयत्याने वार करण्यात आले. आत्तापर्यंत दोन्ही गटांतील दहा आरोपींना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रांचा व फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

गणेशोत्सवात सिंहगड, पानशेत रस्त्याला छावणीचे स्वरूप

टोळी युद्धातील बेछूट गोळीबाराने सिंहगडाची दरी-खोर्‍यांसह खानापूर, सांबरेवाडी, थोपटेवाडी, मणेरवाडीचा परिसर हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या सशस्त्र फौजफाट्यासह हवेली, पौड, वेल्हे, राजगड पोलिस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर, सांबरेवाडीसह सिंहगड किल्ल्याच्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांच्या दंगा काबू पथकासह खानापूर, सांबरेवाडी येथे रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात होता.

2024-09-16T10:21:10Z dg43tfdfdgfd