काँग्रेसला जालन्यात मोठं खिंडार; दानवेंकडून निवडणुकीपूर्वी करेक्ट कार्यक्रम

जालना, रवी जैस्वाल, प्रतिनिधी : जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. अंबड काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह पाच विद्यमान आणि 6 माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काँग्रेसचे अंबड तालुका अध्यक्ष केदार कुलकर्णी यांच्यासह आजी, माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जालन्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून अंबडची काँग्रेसची अख्खी कार्यकारिणी भाजपात दाखल झालीये. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह 5 विद्यमान आणि 6 माजी नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला आहे. अंबडमध्ये केदार कुलकर्णी हे अशोक चव्हाण यांचे समर्थक आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचाही भाजपातील प्रवेश निश्चित मानला जात होता. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत केदार कुलकर्णी यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यामुळे हा जालन्यात काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान हा काँग्रेसाठी मोठा धक्का आहे, असे धक्के देशभरात सुरू असून आणखी बरेच लोक भाजपात येणार असल्याची प्रतिक्रिया या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. जालन्यात पुन्हा एकदा भाजपाच्या वतीनं रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसच्या वतीनं कल्याण काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र या पक्षप्रवेशामुळे कल्याण काळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

2024-04-20T02:43:36Z dg43tfdfdgfd