एक घोडा, दो दुल्हे निकल गये! महामार्गावर लुटमारीसाठी कोडवर्डचा वापर, पोलिसांनी 'अशा' आवळल्या मुसक्या

धुळे : महामार्गावर सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांची लुट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (Dhule LCB) यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून लुटीतील ६ लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर यातील एक संशयित पसार असून त्याचा शोध सुरु आहे. या गुन्ह्यात संशयितांनी 'एक घोडा दो दुल्हे निकल गये' असा कोडवर्डचा वापर करुन गुन्हा केल्याचे पोलीस (Police) तपासात उघडकीस आले आहे.

याबाबत  अधिक माहिती अशी की, धरणगाव जि. जळगाव येथील किशोर पंढरीनाथ पाटील व त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा असे दोघे, धुळे (Dhule) शहरातील जे.बी. रोडवरील रत्न ट्रेडींग येथुन सोयाबीन विक्रीचे 10 लाख 91 हजार रुपये घेवून मोटारसायकल (एमएच 19 बीई 1807) ने धरणगाव येथे जात असताना फागणे गावाच्या पुढे दोन अनोळखी तरुण मोटारसायकलवर आले. 

मोटारसायकलच्या डिक्कीतून रोकड लंपास 

त्यांनी किशोर पाटील यांना तु माझ्या बहिणीचे नाव का घेतले, अशी विचारणा केली. त्यामुळे किशोर पाटील हे घाबरले. ते पुढे गेले असता, मोटारसायकलवरील दुसऱ्या तरुणाने किशोर पाटील यांच्या चालत्या मोटारसायकलीस लाथ मारुन खाली पाडून त्यांना जखमी केले. शिवाय, मोटारसायकलच्या डिक्कीतून रोकड घेवून ते पसार झाले. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दोन तरुणांच्या संशयास्पद हालचाली 

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तेथील परिस्थितीचा अभ्यास करुन किशोर पाटील यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेची दोन पथके रवाना केली. पथकाने जे.बी. रोड ते घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून विश्लेषण केले. यात प्रत्येक फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या अ‍ॅक्सेस मोपेड मोटारसायकलवर दोन तरुण जाताना दिसत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्याअनुषंगाने तपासाचे चक्र फिरविले.

पाच संशयित ताब्यात

त्यानंतर श्री रत्न ट्रेडींग येथे कामास असलेला यश विश्वनाथ ब्रम्हे (22) रा. पवननगर, चाळीसगावरोड, धुळे याच्या हालचाली संशयास्पद दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे साथीदार राहुल अनिल नवगिरे (22), कल्पेश शाम वाघ (26), राहुल शाम वाघ (31) तिघे रा. पवननगर, चाळीसगावरोड, धुळे, चंद्रकांत रविंद्र मरसाळे (21), सनी संजय वाडेकर (28) दोघे रा. मनोहर टॉकीजच्या मागे, धुळे यांनी कट रचुन हा गुन्हा केल्याचे सांगितले. यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून राहुल अनिल नवगिरे हा संशयित फरार आहे. 

एक घोडा दो दुल्हे निकल गये

संशयितांनी किशोर पाटील हे श्री रत्न ट्रेडींग येथून सोयाबीन विक्रीची रक्कम घेऊन धरणगावकडे जाण्यास निघाल्याबाबत राहुल नवगिरे यास त्याच्या मोबाईलवर 'एक घोडा दो दुल्हे निकल गये' असे कोडवर्डच्या माध्यमातुन बोलुन सांगितल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तसेच संशयितांनी वेगवेगळ्या मोटार सायकलींवर ठिकठिकाणी थांबून किशोर पाटील यांचा पाठलाग करुन 10 लाख 91 हजार 900 रुपये लुटून पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यातील राहूल नवगिरे हा पसार असून 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटीच्या रक्कमेपैकी 6 लाख 84 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईतून धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime : जेलमधून सुटताच 'बॉस'ची जंगी मिरवणूक, नंतर नाशिक पोलिसांचा दणका, कुख्यात गुंडांची भर रस्त्यावर काढली धिंड

2024-07-27T12:01:10Z dg43tfdfdgfd