VIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्त

Afghan Diplomat 25 kg Gold In Legging: मुंबई विमानतळावरील एका कारवाईमुळे वरिष्ठ महिला राजनैतिक अधिकाऱ्याला थेट राजीनामा द्यावा लागल्याचा प्रकार मुंबईतून समोर आला आहे. खरं तर मागील महिन्यामध्ये मुंबई विमानतळावर घडलेल्या एका विचित्र प्रकारानंतर ही महिला अधिकारी चर्चेत होती. झाकिया वारदक असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. अफगाणिस्तानच्या भारतामधील सर्वात वरिष्ठ राजनैतिक अधिकारी असलेल्या झाकिया वारदक यांनी दुबईहून 25 किलो सोन्याची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. 18.60 कोटी रुपये मुल्याचं हे सोनं भारतात आणण्याच्या प्रयत्न असलेल्या झाकिया वारदक यांना कस्टम अधिकाऱ्यांनी.रंगेहाथ पकडलं. यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शनिवारी झाकिया वारदक यांनी राजीनामा देत असल्याची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली.

राजीनामा देताना काय म्हटलं?

आपण राजीनामा का देत आहोत यासंदर्भात झाकिया वारदक यांनी पोस्टमध्ये खुलासा केला आहे. "माझ्यावर बरीच वैयक्तिक टीका झाल्याने प्रभावीपणे काम करण्याच्या माझ्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाल्याने मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे," असं झाकिया वारदक यांनी म्हटलं आहे. मात्र या पोस्टमध्ये ढाकिया वारदक यांनी त्यांच्याविरोधात मुंबई विमानतळावर करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख केलेला नाही. महसूल गुप्तचर संचालनालाने (डीआरआय) 25 एप्रिल रोजी झाकिया वारदक यांना मुंबई विमानतळावर चौकशासाठी रोखलं. त्यांच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली असा 25 किलो सोनं सापडलं.  

...म्हणून अटक नाही

झाकिया वारदक या राजनैतिक अधिकारी असल्याने त्यांना अटकेपासून राजकीय संरक्षण असल्याने अटकेची कारवाई झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. नियमाप्रमाणे 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या सोन्याची तस्करी केल्याचं उघड झाल्यास आरोपीला अठक केली जाते. मुंबईमध्ये अशाप्रकारे एखाद्या राजनैतिक अधिकाऱ्याला अशापद्धतीने तस्करीसाठी अटक करण्याची ही पहिलीच घटना आहे. राजनैतिक अधिकारी हे अती महत्त्वाच्या व्यक्तींपैकी म्हणजेच व्हीआयपी असतात. एका व्हीआयपीने असे कृत्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

त्यांना गेटवर अधिकाऱ्यांनी थांबवलं अन्...

झाकिया वारदक या दुबईवरुन मुंबईत येत असताना एमिरिट्सच्या विमानाने त्या 25 एप्रिल रोजी सायंकाळी 5.45 ला विमानतळावर आल्या. त्यांना ग्रीन चॅनेलच्या माध्यमातून बाहेर पडण्याची मुभा होती. त्या थेट बाहेर पडल्या आणि विमानतळातून बाहेर पडण्याआधीच मुख्य एक्झीट गेटजवळ अधिकाऱ्यांनी त्यांना हटकलं. झाकिया वारदक यांच्याबरोबर असलेलं सामना तपासण्यात आलं असता त्यामध्ये काहीही आढळून आलं नाही. मात्र एका वेगळ्या रुममध्ये नेऊन झाकिया वारदक यांची महिला अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तपासणी घेण्यात आली. त्यावेळेस झाकिया वारदक यांच्या लेगिन्स, विशेष जॅकेट, गुडघ्याजवळ लावलेली नी कॅप, हातावरील बेल्टमध्ये सोनं आढळून आलं. एकूण 25 सोन्याची बिस्कटं सापडली. यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाणघेवण सुरु असून सध्या तरी झाकिया वारदक यांनी राजीनामा दिला आहे. भारताने या प्रकारासंदर्भात अफगाणिस्तान सरकारला कळवलं असून पुढील प्रक्रिया सुरु असली तरी डिप्लोमॅटिक इम्युनिटीमुळे झाकिया वारदक यांना अटक करण्यात आलेली नसली तरी पुढील कारवाईचा मार्ग आता त्यांच्या राजीनाम्यानंतर मोकळा झाला आहे.

2024-05-05T02:13:09Z dg43tfdfdgfd