SHARAD PAWAR | शरद पवार सोमवारी चिपळुणात येणार

चिपळूण शहर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे येत्या सोमवारी (दि. २३) चिपळूण दौऱ्यावर येणार असून, यावेळी बहादूरशेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या न.प.च्या स्वा. सावरकर मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.

पाच वर्षांनंतर शरद पवार प्रथमच चिपळूण दौऱ्यावर येत असून, यावेळी ते समाजातील सर्व घटकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती पक्षाचे रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबन कनावजे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. रमेश कदम, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे, माजी नगराध्यक्ष सूजय रेडीज, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अन्वर जबले, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, सावित्री होनकळस, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, महिला आघाडी तालुकाध्यक्षा राधा शिंदे, शहर अध्यक्षा डॉ. रेहमत जबले, कार्याध्यक्षा अंजली कदम, रुही खेडेकर, हिंदुराव पवार उपस्थित होते.

यावेळी निरीक्षक कनावजे यांनी माहिती देताना सांगितले की, शरद पवार चिपळूणच्या दौऱ्यावर सुमारे पाच वर्षांच्या कालावधीनंतर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह जनतेशी संवाद साधण्यासाठी पवार यांच्या सभेचे आयोजन सकाळी ११ वा. करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान पवार हे आदल्या दिवशी चिपळूणला मुक्कामी येणार आहेत. त्यानंतर चिपळुणात सभेसह दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत.

चिपळुणात त्यांचा दिवसभर मुक्काम असणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. अन्य चार मतदारसंघात आघाडीतील मित्रपक्ष उद्धव ठाकरे सेना गटाचे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपामध्ये वरिष्ठांकडे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यातून एकमेव प्रशांत यादव यांचे नाव सूचविले आहे.

या मतदारसंघात अन्य कुठल्याही इच्छुकाने उमेदवारीसाठी मागणी केली नाही. मात्र, काहीजण या मतदारसंघातील उमेदवारीवरून राजकीय संभ्रम निर्माण करीत आहेत. हा संभ्रम दूर करण्यासाठी श्री. पवार हे चिपळुणात येणार आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासंदर्भात या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा पक्षाची असली तरीही महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांना सन्मानाने बोलाविले जाणार आहे.

राज्यातील सत्तांतरामध्ये महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आदी पक्षातील बहुसंख्य आमदार महायुतीच्या सत्तेत सामील झाले आहेत. त्यांनी सत्तेशिवाय कामे होत नाहीत, अशी कारणे दिली आहेत. ज्यांना राजकारणात सर्वकाही दिले, मोठे केले, राजकारण शिकविले असे अनेकजण पवार यांना सोडून गेले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच सत्तेशिवाय विकास करता येत नाही असे म्हणणारे नेतेदेखील चिपळुणात येणार आहेत. त्यामुळे सत्तेसाठी गेलेल्यांच्या नेत्यांसमोर किती गर्दी होते व श्री. पवार यांच्या सभेला किती गर्दी होते हे चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया निरीक्षक कनावजे यांनी व्यक्त केली.

2024-09-19T06:00:27Z dg43tfdfdgfd