SASSOON HOSPITAL PUNE: ससूनमध्ये तब्बल ४ कोटींचा घोटाळा; कर्मचाऱ्यांचं संगनमत, २५ जणांवर गुन्हा, काय प्रकरण?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गेल्या वर्षभरापासून विविध गैरकृत्यांमुळे वादात अडकलेल्या ससून रुग्णालयात आता तेथील कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी २५ जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तत्कालीन लेखपाल अनिल माने (रा. हडपसर वय ५३), रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार (वय ४५, रा. क्विन्सगार्डन कॅम्प) यांच्यासह ससूनच्या आणि काही खासगी अशा २३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागासह बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची परवानगी नसताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने रुग्णालयातील १६ कर्मचारी आणि अन्य आठ खातेदारांच्या खात्यातून चार कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपयांचे वितरण स्वत:च्या व अन्य खातेदारांच्या खात्यामध्ये केल्याचे उघकीस आले आहे.

प्राथमिक चौकशीनंतर पोलिसात तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहारामध्ये लेखपाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचा सहभाग आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत घडला आहे. रुग्णालयाच्या आर्थिक नोंदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे ससून प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ससून प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राथमिक चौकशी केली. या चौकशीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तात्काळ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासने दिल्या. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर महिन्याला वळवली रक्कम

कर्मचाऱ्यांनी ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत ससूनच्या सरकारी खात्यातून स्वत:च्या व अन्य साथीदारांच्या खात्यात रक्कम वळवली. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी १८ लाख ७८ हजार १२१ रुपये, सहा सप्टेंबर : ३९ लाख ३४ हजार ४०७, २० सप्टेंबर : १८ लाख ७८ हजार १२१, पाच ऑक्टोबर : ३१ लाख ६२ हजार ५८४, सहा नोव्हेंबर : ३९ लाख ५३ हजार २३०, आठ डिसेंबर : १ कोटी, १२ डिसेंबर : ३९ लाख ५३ हजार २३०; तसेच ३० लाख ६७ हजार २६१ रुपये, तर १६ डिसेंबर : ५९ लाख २९ हजार ८४५, २७ डिसेंबर : ५८ लाख ५५ हजार ४१० रुपये सरकारी खात्यातून स्वत:च्या खासगी खात्यामध्ये वळवले. यंदाच्या २४ जानेवारी रोजी ६२ लाख ५० हजार ७३३ रुपये वळवण्यात आले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-16T01:28:47Z dg43tfdfdgfd