PUNE PORSCHE CRASH: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी ९०० पानांची चार्जशीट दाखल; मात्र, मुख्य आरोपीचे नाव वगळले

Pune Porsche Crash: पोर्शे कार अपघातप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध पुणे न्यायालयात तब्बल ९०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपींमध्ये अपघाताच्या वेळी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या पालकांचाही समावेश आहे. आरोपीच्या पालकांशिवाय डॉ.अजय तावडे, डॉ.श्रीहरी हरनोळ, अतुल घाटकांबळे, अश्पाक मकांदर आणि अमर गायकवाड यांना देखील या प्रकणी आरोपी करण्यात आले आहे.

पुण्यात कल्याणी नगर येथे १९ मे रोजी आलीशान पोर्शे कार चालवत बिल्डरपुत्राने दोघांना उडवले होते. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघातानंतर दोन महिन्यांनंतर शुक्रवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सत्र न्यायालयात गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या ९०० पानांच्या आरोपपत्रात १७ वर्षीय मुख्य आरोपीचे नाव वगळण्यात आले आहे. किशोरवयीन मुलाचे प्रकरण बाल न्याय मंडळासमोर (जेजेबी) आहे, तर सात जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हेगारी कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी सकाळी हा अपघात घडला, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत चालविलेल्या आलीशान पोर्शे कारने दोन मोटरसायकलस्वार आयटी व्यावसायिकांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला होता. दोघेही मूळ मध्य प्रदेशातील असून आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.

अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे म्हणाले, 'आम्ही गुरूवारी पुण्याच्या न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात अल्पवयीन मुलाचे पालक, दोन डॉक्टर आणि ससून जनरल हॉस्पिटलचा एक कर्मचारी आणि दोन मध्यस्थांचा समावेश आहे. आरोप पत्रात ५० साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त बलकवडे म्हणाले की, दोषारोपपत्रात अपघात परिणाम विश्लेषण अहवाल, तांत्रिक पुरावे, न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि डीएनए आदी अहवालाचा समावेश आहे.

Navi mumbai building collapsed: नवी मुंबईत पहाटे भीषण दुर्घटना! शहाबाज येथे ३ मजली इमारत कोसळली; बचाव कार्य सुरू

पोलिसांनी आरोपींचा अंतिम अहवाल १८ जून रोजी बाल न्याय मंडळासमोर सादर केला होता. त्यात त्याच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज आणि त्याने पार्टी केलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज होते. त्याने दारूही प्राशन केली होती. यावेळी आरोपींसोबत असलेल्या मित्रांचे जबाबही घेण्यात आले. २५ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपींची बळ सुधारगृहातून सुटका केली होती. यानंतर आरोपीने शिक्षा म्हणून निबंध लिहिण्याची दिलेली शिक्षाही पूर्ण केली.

2024-07-27T04:02:40Z dg43tfdfdgfd