PUNE PMPML : लोकसभा निवडणुकीत पीएमपीएमएल मालामाल, मतदान प्रक्रियेमध्ये दिलेल्या ९३१ गाड्या

अभिजित दराडे, पुणे : पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीची जीवनवाहिनी असणाऱ्या पीएमपीएमएलने लोकसभा निवडणुकीत भरघोस उत्पन्न कमावलं आहे. नेहमीच तोट्यात असणारी पीएमपीएमएल लोकसभा निवडणुकीत मात्र मालामाल झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ, बारामती या लोकसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात मतदान झाले. ७ मे आणि १३ मे रोजी या चार मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. या मतदान प्रक्रियेमध्ये मतपेट्या वाहून नेण्यासाठी पीएमपीएमएलकडून ९३१ गाड्या देण्यात आल्या होत्या. यामधूनच पीएमपीएमएल प्रशासनाला तब्बल एक कोटी ५७ लाखांचं उत्पन्न मिळालं आहे.

दरम्यान, लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये पीएमपीएमएलकडून मतपेट्या वाहून नेण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत बस पुरवण्यात येत असतात. त्यासाठी कोणत्या मतदान केंद्रावर किती बस हव्या आहेत याची माहिती निवडणूक नियोजन अधिकारी पीएमपीएमएलला देत असतात. त्यानुसारच पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात ९३१ बस मतपेट्या वाहून नेण्यासाठी वापरण्यात आल्या.

यामध्ये प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे शहराच्या लगत येणारा मतदारसंघ अर्थात खडकवासला विधानसभा मतदारसंघात ११३ बस पुरवण्यात आल्या होत्या. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या भोसरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये १४० बस पुरवण्यात आल्या होत्या. तर मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या चिंचवड आणि पिंपरी या विधानसभा मतदारसंघासाठी १७५ बस देण्यात आल्या होत्या.

तर सर्वाधिक ५०३ बस या पुणे लोकसभा मतदारसंघ देण्यात आल्या होत्या. यामधून पीएमपीएमएलला तब्बल दीड कोटींचं उत्पन्न मिळालं आहे. त्यामुळे एरवी सतत तोट्यामध्ये असणारी पीएमपीएमएल लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र मालामाल झाली आहे.

पीएमपीएमएलचं ब्रेकडाऊन थांबणार तरी कधी?

लोकसभा निवडणुकीमध्ये पीएमपीएमएल फायद्यात आली असली, तरी पीएमपीएमएलचा ब्रेक डाऊनचा प्रश्न मात्र ऐरणीवर आहे तसाच आहे. मागील काही दिवसात तब्बल साडेतीनशे बस ब्रेकडाऊन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पीएमपीच्या ताब्यात १९४८ इतक्या बसेस आहेत. त्यापैकी १४०० ते १५०० बसच मार्गावर असतात. त्यातही जवळपास ५० बस या दररोज ब्रेक डाऊन होत असल्याची नोंद आहे. त्यामुळे पुणेकरांना याचा मनस्ताप सोसावा लागत आहे. ८ ते १४ एप्रिल दरम्यानची आकडेवारी पाहिली तर ३४९ बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-19T04:29:20Z dg43tfdfdgfd