NAVI MUMBAI: मोरबे धरणग्रस्त आक्रमक; नवी मुंबईचे पाणी रोखणार, पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा

तुषार पाटील, प्रतिनिधीMorbe Dam Raigad: नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या चौक मोरबे धरणासाठी जमीन संपादीत करताना शासनाने जी आश्वासने दिली होती ती पाळली नाहीत. मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचे गेल्या तीस वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. आपल्या मागण्यांसाठी धरणग्रस्तांनी 27 जूनपासून धरणासमोरील परिसरात साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र, आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने धरणग्रस्तांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. धरणग्रस्तांनी थेट नवी मुंबईला होणारा पाणी पुरवठा रोखण्याचाच इशारा दिला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचा कोणीही अधिकारी फिरकला नसल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्त संतापले आहेत. याअगोदर नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी 300 पेक्षा अधिक अर्ज करुनही कानाडोळा होत आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान आठ महसूल गावे, सात आदिवासी वाड्या यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादन करण्यात आल्या. नोकरी, विकसित जमीन, व्यवसाय मिळेल असे खोटे आश्वासन देण्यात आले. आज 33 वर्षाचा कालावधी लोटला तरीही न्याय्य हक्कांसाठी लढा द्यावा लागतो या सारखे दुर्दैव नाही, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. शासनाने दखल न घेतल्याने अखेर उद्या (4 जुलै 2024) नवी मुंबई महानगरपालिका यांना होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा मोरबे धरण प्रकल्पग्रस्त यांनी दिला आहे. त्यामुळे धरण प्रकल्पग्रस्त नवी मुंबई महानगरपालिकेचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मोठमोठी धरणे महाराष्ट्रात उभी केली आहेत. मोरबे धरण हेसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभे केले आहे. मोरबे धरणाची उंची 88 मीटर इतकी आहे. मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणी पुरवठ्यासाठी दररोज 420 एमएलडी पाणी वापरले जाते. त्यामधून नवी मुंबईसोबतच कामोठे आणि मोरबे परिसरातील गावांना पाणी पुरवठा केला जातो.

मोरबे धरणाची पातळी 88 मीटर आहे. जेव्हा धरण पूर्ण भरते तेव्हा धरणात 190.89 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. मोरबे धरण क्षेत्रात पाऊस समाधानकारक पडल्यास नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटते.

2024-07-03T06:39:16Z dg43tfdfdgfd