NASHIK CRIME NEWS | तब्बल 27 दुचाकी चोरणारा चोरटा जळगाव जिल्ह्यातून गजाआड

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या परिसरातून दुचाकी वाहने चोरी करून ती जळगाव जिल्ह्यात विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यास शहर पोलिस व पारोळा पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडले. संशयितांकडून वाहनचोरीचे १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

किशोर संजय चौधरी (३०, रा. तरवाडे, ता. पारोळा, जि. जळगाव) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ११ लाख १७ हजार रुपयांच्या २७ दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयित चौधरी हा शहरातील कंपनीत कामगार म्हणून काम करायचा. दुचाकींची चोरी करून साप्ताहिक सुटीच्या दिवशी तो चोरीचे वाहने जळगाव जिल्ह्यात कमी भावात विक्री करीत होता. नाशिक शहर पोलिसांच्या दुचाकी चोरी शोध पथकाने पारोळा पोलिसांच्या मदतीने संशयित चौधरी यास पकडले.

स्वतंत्र दुचाकी चोरी शोध पथक कार्यान्वित

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हेशाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासह चोरट्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र दुचाकी चोरी शोध पथक कार्यान्वित केले. या पथकाने प्रत्येक वाहनचोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही तपासले. त्यात बहुतांश दुचाकी चोरीची पद्धत एकसारखीच आढळून आली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे, पथकाचे उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांच्यासह पथकाने संकलित केलेल्या माहितीनुसार, संशयित चोरटा पारोळा भागातील असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून चौधरी यास पकडले. त्याने वाहनचोरीची कबुली देत नाशिकमधील सातपूर, पंचवटी व मुंबई नाका भागातून २७ दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पथकाने तपास करून या दुचाकी हस्तगत करून नाशिकला आणल्या आहेत.

कवडीमोल भावात दुचाकींचा व्यवहार

संशयित चौधरी हा आठवडाभरात संधी मिळेल तशी वाहने चोरी करत होता. त्यानंतर साप्ताहिक सुटीच्या दिवशी चोरीच्याच दुचाकीवरून गावी जात. गावाकडील शिवरे, तरवाडे, आडगाव आणि धरणगाव येथे गरजू शेतकरी व सामान्यांना पाच ते दहा हजारांत वाहने देत होता. वाहनाची कागदपत्रे आणून देतो असे सांगून तो ठरलेल्या व्यवहाराचे ५० ते ६० टक्के पैसे घेत त्यानंतर उर्वरित पैसे घेण्यासाठी तो जात नसल्याचे उघड झाले.

दुचाकी मालकांचा शोध सुरू

पोलिसांनी हस्तगत केलेल्या २७ दुचाकींपैकी १४ दुचाकी मालकांचा शोध लागला असून, पंचवटीतील सर्वाधिक दहा, सातपूरकडील तीन व मुंबई नाका पोलिसांकडील एक असे १४ गुन्हे उघड झाले आहेत. उर्वरित १३ वाहनमालकांचा शोध सुरू आहे. दरम्यान, उघड झालेले नऊ गुन्हे हे १ जुलै २०२४ पूर्वी दाखल आहे.

2024-09-18T07:37:01Z dg43tfdfdgfd