NAMAMI GODA PROJECT | 'नमामि गोदा'ची व्याप्ती वाढणार

नाशिक : 'नमामि गंगे'च्या धर्तीवर नाशिक महापालिकेने तयार केलेल्या २,७८० कोटींच्या 'नमामि गोदा' प्रकल्पाची व्याप्ती आता वाढणार आहे. हा प्रकल्प नाशिकपुरता मर्यादित न राहता त्र्यंबकेश्वर येथील उगमस्थानापासून आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथील समुद्र भेटीपर्यंतचा तब्बल १,४५० किलोमीटर लांबीच्या गोदापात्राचे संवर्धन करण्याची योजना हाती घेण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. यासाठी केंद्र, राज्य शासनासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना या प्रकल्पात सामावून सर्वसमावेशक आराखडा तयार केला जाणार आहे. केंद्रीय प्रधान सचिवांनी यासंदर्भात महापालिकेला सूचना देत आराखड्यात दुरुस्त्या सुचविल्या आहेत.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर गोदावरी नदी संवर्धनासाठी 'नमामि गोदा' प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेतील भाजपच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १,८०० कोटी रुपयांचा निधी देण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. यासाठी महापालिकेने सल्लागार संस्थेची नियुक्ती करत २,७८० कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला. सद्यस्थितीत या आराखड्याची छाननी सुरू आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींनी या प्रकल्पासंदर्भात गुरुवारी नवी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयाचे प्रधान सचिव मित्तल यांची भेट घेतली. 'नमामि गंगा' प्रकल्पाची माहिती घेताना नाशिक महापालिकेने तयार केलेल्या 'नमामि गोदा' प्रकल्पाच्या प्रारूप आराखड्याचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले. यावेळी प्रधान सचिवांनी या प्रकल्पाची व्याप्ती वाढविणे आवश्यक असल्याचे सांगत गोदावरी नदीच्या उगमापासून ते नदी समुद्राला मिळेपर्यंत हा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले.

Namami Goda : नमामि गोदा’ प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण; कसा आहे प्रकल्प? किती येणार खर्च?

सर्वसमावेशक आराखडा तयार करणार

'नमामि गोदा' प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नदीचा प्रवाह असलेल्या तीन राज्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाईल. महापालिकेसह जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, वन व पर्यावरण विभागांनाही या प्रकल्पात समाविष्ट केले जाईल. सर्वसमावेशक आराखडा तयार करून तो नमामि गंगाच्या धर्तीवर राबवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सिंहस्थाचा मुहूर्त टळणार

येत्या २०२७मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 'नमामि गोदा' प्रकल्प राबविण्याचे महापालिकेचे नियोजन होते. सिंहस्थानिमित्त नाशिकमध्ये येणाऱ्या साधू-महंत व भाविकांना प्रदूषणमुक्त गोदावरीचे रूप दिसावे, अशी यामागील भूमिका होती. मात्र आता या प्रकल्पाची व्याप्ती वाढणार असल्याने सिंहस्थापूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणे कठीण आहे.

2024-09-07T05:32:18Z dg43tfdfdgfd