MUMBAI LOCAL MEGA BLOCK: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block 5th May : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी 5 मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसणार आहे, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रविवारी कुठे मेगाब्लॉक असेल ते सविस्तर जाणून घेऊयात...

माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊनमार्गावर मेगाब्लॉक

CSMT वरुन सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील, या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

ठाण्यातून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या गाड्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यानंतर या गाड्या पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील, या गाड्या 15 मिनिटे उशिरा धावतील.

डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वी शेवटची बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल, ब्लॉकनंतरची पहिली बदलापूर लोकल CSMT येथून दुपारी 3.39 वाजता सुटणार आहे. तर अप जलद मार्गावरील, ब्लॉकपूर्वीची शेवटची अंबरनाथ लोकल CSMT ला सकाळी 11.10 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली आसनगाव लोकल CSMT ला दुपारी 4.44 वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर या कालावधीत मेगाब्लॉक

CSMT - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- CSMT अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत बंद राहतील. तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून CSMT ला जाणाऱ्या गाड्या सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत बंद असणार आहेत. तर CSMT साठी गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी 10.45 ते 5.13 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

ब्लॉकपूर्वी CSMT वरुन पनवेलसाठी सकाळी 11.04 वाजता शेवटची लोकल सुटेल. तर गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची सकाळी 10.22 वाजता सुटेल. तर ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल CSMT वरुन दुपारी 04.51 वाजता सुटेल. तर वांद्रेसाठी 04.56 वाजता लोकल सुटेल.

ब्लॉकपूर्वी पनवेलवरुन CSMT साठी सकाळी 09.40 वाजता शेवटची लोकल असेल. तर CSMT साठी वांद्रे येथून सकाळी 10.20 वाजता शेवटची लोकल असेल. ब्लॉकनंतर पनवेल वरुन CSMT साठी पहिली लोकल दुपारी 3.28 वाजता सुटेल. तर गोरेगाववरुन ब्लॉकनंतर CSMT साठी पहिली लोकल दुपारी 04.58 वाजता सुटणार आहे.

2024-05-04T03:24:20Z dg43tfdfdgfd