MARATHA RESERVATION: मराठा आरक्षण प्रश्न सोडवता आला असता पण शरद पवारांनी...; गिरीश महाजन स्पष्टच बोलले

लातूर (ऋषी होळीकर): मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर हल्ला चढवला आहे. लातूर येथे बोलताना ते म्हणाले, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत पण त्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही. तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुमच्या मागे येऊ कारण तुम्ही एवढे दिवस सत्तेत राहिले आहेत आणि मराठा आरक्षण प्रश्न हा सर्व पक्षाच्या बैठकीतून सोडविता आला असता पण सगळे विरोधी पक्ष हे गैरहजर राहिले यावर काय समजायचे, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षण प्रश्न राज्यात सोडवा

आरक्षणाचा प्रश्न राज्यानेच सोडवावा केंद्रात जाऊन काहीच होणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सर्व नेते सांगत आहेत शरद पवारांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी आपल्या कारकीर्दीत काहीच केले नाही. आपण मुख्यमंत्री होतात, राज्यात आपले सरकार होत त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्चारला नाही, आता सल्ला देता चालले आहेत. ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते त्यावेळी बैठकीला यायचे नाही. लोकांना येऊ द्यायचे नाही नंतर लोकांना उद्देश द्यायचे हे काही योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी लातूर पत्रकारांशी बोलताना दिली.

शरद पवार यांची दुटप्पी भूमिका

शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत पण त्यांच्या काळात मराठा आरक्षणाचा 'म' सुद्धा त्यांनी उच्चारला नाही. यामुळे शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये येऊन हा प्रश्न सोडवावा, असे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. शरद पवार हे बाहेर एक बोलतात आणि आत मध्ये एक बोलतात. यामुळे पवार साहेबांनी आधी भूमिका स्पष्ट करावी, असे देखील गिरीश महाजन यांनी सांगितले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-27T13:40:28Z dg43tfdfdgfd