LOKSABHA ELECTIONS : मतदानासाठी ओळखीचे कोणते पुरावे ग्राह्य, माहिती आहेत का?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून, त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत 7 मे रोजी बारामती आणि 13 मे रोजी मावळ, पुणे आणि शिरूर या तीन मतदारसंघांत मतदान होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे, असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीअंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाचा दस्तावेज, संसद, विधानसभा,विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण करण्यात येत आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्र सोबत न्यावे, असे आवाहनही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आपल्या मतदान केंद्राविषयी जाणून घ्या

मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत कोथरूड, शिवाजीनगर, वडगावशेरी, कसबा, पर्वती आणि पुणे कॅन्टॉन्मेंट मतदारसंघ आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा आणि खडकवासला मतदारसंघांचा समावेश होतो. शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांचा भाग आहे. लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता नागरिकांनी मतदानापूर्वी आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी.

जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यादृष्टीने मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार साहाय्यता केंद्र स्थापित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा अ‍ॅपद्वारेही ही माहिती मिळू शकेल. मतदारांना वितरित करण्यात येणार्‍या मतदार माहिती चिठ्ठीद्वारे देखील कुठे मतदान करावयाचे आहे, ते कळू शकेल. मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

हेही वाचा

2024-05-04T03:35:58Z dg43tfdfdgfd